सोनिया मिश्रा, प्रतिनिधी रुद्रप्रयाग, 27 जून : अनेक मंदिरांनी सजलेली उत्तराखंडची धार्मिक भूमी जगप्रसिद्ध आहे. येथील मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ येथे असलेलं हे ओंकारेश्वर मंदिर आपलं बांधकाम आणि बाबा मदमहेश्वर यांचं शीतकालीन निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात बाबांच्या दर्शनासाठी भाविक लांबच लांब रांगा लावतात. मंदिराचे मुख्य पुजारी शिव शंकर लिंग सांगतात की, ओंकारेश्वर मंदिर हे भगवान केदारनाथ आणि बाबा मदमहेश्वर यांचं हिवाळी आसन आहे. शिवाय सूर्यवंशी महाराज मांधाता यांनी याठिकाणी तपश्चर्या केली होती. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपल्या वैभवाचा त्याग केला आणि तीर्थयात्रा करत ते या पवित्रस्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी हजारो वर्ष महादेवाची आराधना केली. महादेवाने त्यांना ‘ओंकार’ रूपात पुण्यफळ दिलं, अशी आख्यायिका आहे. त्यावरूनच या मंदिराला ‘ओंकारेश्वर’ असं नाव पडलं.
दरम्यान, अशीही आख्यायिका आहे की, उषा (बाणासुराची कन्या) आणि अनिरुद्ध (कृष्णाचा नातू) यांचा विवाह याच मंदिरात झाला होता. त्याचबरोबर मंधाता सम्राट आणि भगवान रामाच्या पूर्वजांनी संसारिक सुखांचा त्याग करून याठिकाणी एका पायावर उभं राहून 12 वर्ष तपश्चर्या केली होती. तपश्चर्येच्या शेवटी महादेवांनी त्यांना ओंकार रूपात दर्शन देऊन आशीर्वाद दिला. त्यामुळे या मंदिराला ओंकारेश्वर म्हटलं जातं, अशीही मान्यता आहे. म्हणजे एकूणच भगवान शंकराच्या ओंकारेश्वर रुपावरून या मंदिराचं नामकरण झालं आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)