सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 21 जुलै : जगभरातील करोडो रामभक्त ज्या क्षणाची वाट पाहत आहेत, तो क्षण आता काही दूर नाही. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिरात लवकरच रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. सध्या या मंदिराच्या स्तंभांवर मूर्ती कोरण्याचं काम सुरू आहे. हे मंदिर केवळ भव्य असणार नाही, तर ते स्थापत्यकलेचा एक अद्वितीय नमुनाही ठरणार आहे. मंदिर हजारो वर्ष सुरक्षित राहावं यासाठी सर्वोत्तम बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय. मंदिराचं बांधकाम ज्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यांनी मंदिर हजारो वर्ष सुरक्षित राहील, असं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भविष्यात कधी 8.0 तीव्रतेचा भूकंप आला तरीसुद्धा हे मंदिर जागचं हलणार नाही. भयंकर वादळ आलं तरीसुद्धा मंदिराला जराही तडा जाणार नाही. बांधकामातूनच मंदिराचं नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यात आलं आहे. त्यासाठी संपूर्ण मंदिर लोखंडाचा अजिबात वापर न करता खडकांनी बांधलं जातंय.
आज 70 फूट खोल खडकांवर भव्य राम मंदिर आकार घेत आहे. मंदिराच्या पायाभरणीत कर्नाटकातील ग्रेनाइट दगड वापरण्यात आले आहेत, ज्यात पाण्याची गळती सहन करण्याचीही क्षमता आहे. मंदिराचा पाया सुमारे 50 फूट खोल आहे. तसेच शरयू नदीच्या प्रवाहापासून संरक्षण करण्यासाठी मंदिराभोवती चारही बाजूंनी सुमारे 40 फूट खोल भिंत उभारण्यात आली आहे. ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कॅम्प ऑफिस प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तब्बल हजार वर्ष नव्यासारखं आणि भक्कम राहील, असं राम मंदिराचं बांधकाम करण्यात येत आहे. मंदिराच्या बांधकामात तसूभरही कमतरता राहू नये यासाठी देशातील प्रतिष्ठित आयआयटीच्या अभियंत्यांची मतं घेतली जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. जसं केदारनाथ मंदिर पाण्याच्या प्रचंड प्रवाहात जसंच्या तसं राहिलं होतं. तसंच राम मंदिर बांधलं जातंय.’