मुंबई, 31 जानेवारी : अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्याचं काम खूपच वेगाने चाललं आहे. 2024च्या जानेवारीपर्यंत श्रीराम मंदिराच्या तळमजल्याचं काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच कामाला वेग आला असून, नागरिकांमध्येही उत्साह दिसत आहे. या मंदिरातली रामाची मूर्ती कशी असेल, याबद्दलही सर्वांमध्ये उत्सुकता आहे. या भव्य मंदिरातली रामाची मूर्ती शाळिग्राम शिळेपासून तयार केली जाणार आहे. त्यासाठीची शाळिग्राम शिळा नेपाळमधल्या गंडकी नदीतून आणली जात आहे. या शिळेचे दोन तुकडे असून, या दोन्ही तुकड्यांचं एकत्रित वजन 127 क्विंटल आहे. हे दोन शिलाखंड 2 फेब्रुवारी 2023पर्यंत अयोध्येत आणले जाणार आहेत. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सध्या हे शिलाखंड नेपाळमधल्या जनकपूरमध्ये आणण्यात आले आहेत. तिथल्या मुख्य मंदिरात पूजा-अर्चेनंतर या शिलाखंडांच्या पूजेचीही सुरुवात करण्यात आली आहे. या विशेष पूजेनंतर हे शिलाखंड भारतात आणले जातील. 31 जानेवारीपर्यंत हे शिलाखंड गोरखपूरमधल्या गोरक्षपूरमध्ये आणले जातील.
काय आहे धार्मिक महत्त्व?
शाळिग्राम शिळेत भगवान विष्णूंचं अस्तित्व असतं, असं शास्त्र सांगतं. तुळशीमाता आणि भगवान शाळिग्राम यांचा उल्लेखही पौराणिक ग्रंथात आढळतो. शाळिग्रामाचा संबंध भगवान विष्णूंशी असल्याने या शिळाखंडांना मोठं धार्मिक महत्त्व आहे. या शिळांचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रामुख्याने गंडकी नदीतच सापडतात. हिमालयाच्या परिसरात पाणी आदळून या शिळांचे छोटे तुकडे होतात. नेपाळमध्ये अनेक जण हे दगड शोधून काढतात आणि त्यांची पूजा करतात.
शाळिग्राम 33 प्रकारचे असतात, असं म्हटलं जातं. शाळिग्राम शिळेचा संबंध भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी जोडला जातो. ज्या घरात शाळिग्राम शिळा असते, त्या घरात सुख-शांती नांदते, कुटुंबीयांत एकमेकांप्रति प्रेम कायम राहतं आणि लक्ष्मीमातेची कृपाही राहते, असं मानलं जातं.
या शिळांमधून श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकार आणि अन्य कलाकारांची निवड करण्यात आली आहे. ही रामाची मूर्ती पाच-साडेपाच फूट उंचीची आणि बालस्वरूप असेल. रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणं थेट राममूर्तीच्या कपाळावर पडावीत, अशा पद्धतीने मूर्तीची उंची निश्चित केली जाणार आहे.
Ambabai Temple Kiranotsav : किरणोत्सव सोहळा 7 दिवस न होण्याची कारणं काय आहेत? Video
कोण साकारणार मूर्ती?
श्रीरामाची भव्य मूर्ती करण्याच्या दृष्टीने या शाळिग्राम शिळांची अनुकूलता, तसंच त्यांचं संभाव्य क्षरण आदी बाबींवर तज्ज्ञांकडून परीक्षण आणि चर्चा केली जाणार आहे. रामाची मूर्ती साकारण्याची जबाबदारी शिल्पकार पद्मभूषण राम वनजी सुतार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं भव्य शिल्पही त्यांनीच साकारलं आहे. अलीकडेच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांना श्रद्धांजली म्हणून अयोध्येत एक वीणा स्थापन करण्यात आली. ती वीणा राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी तयार केली आहे.
750 वर्ष प्राचीन मंदिर, मूर्तींवर हात फिरवला की होतो चमत्कार! Video
मूर्ती तयार करण्याच्या पहिल्या टप्प्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते खासकरून स्केच आणि पोर्ट्रेटसाठी प्रसिद्ध आहेत. त्याव्यतिरिक्त मूर्तिकार पद्मविभूषण सुदर्शन साहू, पुरातत्त्ववेत्ते मनइया वाडीगेर यांच्यासह तंत्रज्ञ आणि मंदिर साकारणारे वास्तुकारही मूर्ती साकारण्यात महत्त्वाची जबाबदारी निभावतील. मंदिराची वास्तू आणि मूर्ती यांच्यातही समन्वय साधला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.