शिखा श्रेया, प्रतिनिधी रांची, 12 जून : आयुष्यात एखादं संकट आलं किंवा नुसती संकटाची चाहूल लागली किंवा कोणतंही संकट येऊ नये, आपली सर्व कामं सुरळीत पूर्ण व्हावी यासाठी आपण सर्वचजण विविध देवस्थानांमध्ये जात असतो. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून देवापुढे माथा टेकवत असतो. प्रत्येक शहरात काही प्रचलित देवस्थानंही असतात जिथे इतर शहरांमधून, राज्यांतून भाविक खास दर्शनासाठी येतात. झारखंडच्या रांचीमध्येही असंच एक प्रचलित देवस्थान आहे. जिथे भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी मान्यता आहे. रांचीच्या तुपुदाना येथील वाइल्ड वाडी पार्कमध्ये असलेल्या या माता रानीच्या मंदिरात भारतातीलच नाही, तर परदेशातून येणारे भाविकही नतमस्तक होतात. असं काय खास आहे या मंदिरात पाहूया. मंदिराचे पुजारी प्रदीप उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘10 वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या या मंदिरात देवी 10 हातांनी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. देवीचे हे 10 हात म्हणजे 10 विविध शक्तींचे प्रतीक आहेत. शिवाय प्रत्येक हातातील शस्त्राचे विशिष्ट अर्थही आहेत. 10 हातांच्या देवीची स्थापना रांचीतील फार कमी मंदिरांमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या मंदिरात स्वच्छ मनाने मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते’, असं पुजारी उपाध्याय म्हणाले.
इंग्लंड, अमेरिकेतून रांचीत येणारे पर्यटक या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय परतत नाहीत. अशी मान्यता आहे की, या मंदिरात पूजा केल्यानंतर देवीला अर्पण केलेलं फुल भक्ताच्या अंगावर पडल्यास भक्ताची मनोकामना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होते. त्यामुळेच अनेक विवाहित स्त्रिया अपत्य सुखाची मागणी घेऊन माता रानीच्या दर्शनाला येतात, तर अनेक तरुणमंडळी लग्न जुळावे यासाठीही या मंदिरात माता रानीची प्रार्थना करतात. त्याचबरोबर अनेक नेतेमंडळीही मंदिरात हजेरी लावत असतात. Job Opportunity: या पदासाठी तब्बल 2138 जागांची भरती, संपूर्ण माहिती इथं विशेष म्हणजे या मंदिराचं ऑनलाईन पद्धतीनेही दर्शन घेता येतं. इतर देशांमध्ये माता रानीचे अनेक भक्त असल्यामुळे त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या देखभालीसाठी दर आठवड्याला एक बैठक घेतली जाते. या बैठकीत विविध देशांतील भाविक सहभागी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)