मुंबई, 16 डिसेंबर : राज्यात मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम कमी झाला असला तरी काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र औरंगाबादमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काल काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, सिन्नर, - नाशिक शहरासह विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
औरंगाबाद शहरासह चित्ते पिंपळगाव, निपाणी, आडगाव, भालगाव, पाचोड, एकोड परिसरात बुधवारी मध्यरात्री जोरदार - पाऊस पडला. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे 40 मि.मी, गंगापूर येथे 30 मि.मी, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील धाडगाव येथे 30 मि.मी, नवापूर 10 मि.मी, नाशिक जिल्ह्यातील येथे नाशिक शहरात 20 मि.मी, तर पेठ येथे 10 मि.मी पावसाची नोंद झाली.
हे ही वाचा : पिकांवर आलंय नवीन भयंकर संकट, रात्रीत होतोय हल्ला Video
वादळी प्रणाली किनाऱ्यापासून सरकतेय दूर
पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. लक्षद्वीपच्या अमनदीवीपासून ६२० किलोमीटर, पणजीपासून ६७० किलोमीटर पश्चिमेकडे असलेली वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकत आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरण्याचे संकेत आहेत. तर आग्नेय बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.
हे ही वाचा : Sangli : अख्ख गाव करतंय गाजराची शेती, कमी कालावधीमध्ये लाखोंचं उत्पन्न Video
जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यासह अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वेगाने खाली पडला आहे. खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट हवामानानुसार, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, दक्षिण गुजरात, कोंकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम वारा यामुळे दिल्लीची हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये असेल.