पुणे, 24 जुलै: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) महामंडळात स्वेच्छा निवृत्तीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे. महामंडळाने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळणार आहे.
बीएसएनएल नंतरची ही सर्वात मोठी स्वेच्छा निवृती असणार आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या स्वेच्छा निवृत्तीच्या निर्णयास एसटी कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. निर्णयाविरोधात एसटी कामगार संघटना कोर्टात जाणार आहे. तसेच आंदोलनही करणार असल्याचं एसटी कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा...खुलेआम काळाबाजार! 1500 रुपये द्या आणि अवघ्या 15 मिनिटांत मिळवा ई-पास
स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळ केवळ 3 महिन्यांचा पगार देणार आहे, याला देखील संदीप शिंदे यांनी विरोध केला आहे. फक्त तीन महिन्यांचा पगाराचा निर्णय आम्हाला मान्य नाही. एसटी कामगारांना हवाय सहा महिन्यांचा पगार आणि वारसाला नोकरी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या संकटात कोलमडला एसटीचा डोलारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटीचा पूर्वीचा तोटा पाच हजार कोटी रुपये आहे. त्यात लॉकडाऊनमुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडे 480 कोटी रुपये मागितले आहेत.
त्यात महामंडळात क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाल्यानं स्वेच्छा निवृत्ती योजना एसटी महामंडळानं आणली आहे. राज्यात एक बस मागे 6:15 कर्मचारी आहेत. देशाच्या 14 राज्याच्या परिवहन मंडळात हे प्रमाण एक बस मागे पाच कर्मचारी आहे.
हेही वाचा... नागपूर हायकोर्टाचा तुकाराम मुंढे यांच्यासह निलंबित आरोग्य अधिकाऱ्याला दणका
पगाराबाबत काय आहे स्थिती?
- गेल्या महिन्यात निम्मे पगार
- 100 दिवसांपासून एस टी सेवा ठप्प
- दिवसाला 22 कोटी उत्पन्नाच्या ठिकाणी 20 लाख रुपये होतंय उत्पन्न
- क्षमतेच्या 10 टक्के गाड्या सुरू
- एकूण क्षमता 18 हजार 500 बस
- सध्या सुरू आहे 1800 बस
- डिझेल, टायर , स्पेअर पार्टचे 800 कोटी थकले
- एसटी पुरवठादार हवालदिल