पिंपरी चिंचवड, 15 जून: काही दिवसांपूर्वी पुण्यातील फुरसुंगी परिसरात कालव्यात दोन मृतदेह वाहून आले होते. एका पुरुषाचा मृतदेह कालव्यातून वाहत आल्यानंतर काही मिनिटांत याठिकाणी एका महिलेचा मृतदेह देखील वाहत आला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील नाशिक फाटा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनंतर परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस महिलेची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. संबंधित अज्ञात मृत महिलेसोबत घातपात झाला असावा, असा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. पण शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतरचं मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. पण संबंधित महिलेची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. मृत महिलेचा रंग गोरा असून केस काळे आहेत. तसेच तिने अंगात काळ्या रंगाचा स्वेटर घातला होता, असा तपशील पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. तसेच संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाली, तर सांगवी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक फाटा पुलाखाली हा मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. अद्याप कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही पुरावा हाती लागतोय का? याची चाचपणी देखील पोलिसांकडून केली जात आहे. हे ही वाचा- दुकानात गेलेल्या तरुणीसोबत घडलं विपरीत; गळा आवळून खून करणाऱ्या चौघांना अटक काही दिवसांपूर्वी फुरसुंगी परिसरात वाहत आलेल्या दोन मृतदेहानंतर, हा तिसरा मृतदेह नाशिक फाटा येथील पुलाखाली आढलला आहे. त्यामुळे अशा अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचं नेमकं कारणं शोधून आरोपींना गजाआड करणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.