मराठी बातम्या /बातम्या /पुणे /चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारात ठाकरेंची शिवसेना गायब; पक्षात दोन गट?

चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारात ठाकरेंची शिवसेना गायब; पक्षात दोन गट?

राष्ट्रवादीच्या प्रचारात ठाकरेंची शिवसेना गायब

राष्ट्रवादीच्या प्रचारात ठाकरेंची शिवसेना गायब

पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीत समन्वय नसल्याचे पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 9 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला जड जाणार असल्याचे दिसत आहे. आधी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गटातील इतर शिवसैनिकही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार यंत्रणेतून गायब आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवणुकीत पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधाण आलंय.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नाना काटे यांच्या नावाची घोषणा होताच शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरीचा हत्यार उपसलं आणि अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे मोठं शक्तिप्रदर्शन करत अजित पवारांच्या उपस्थितीत नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्थानिक शिवसैनिक देखील त्यांच्या शक्ती प्रदर्शनात उपस्थित होते.

मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीकडून ज्या प्रचार सभा, प्रचार रॅली, मेळावे  आणि एवढंच काय तर ज्या जेवणावळ्या घातल्या गेल्या त्यातही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी दिसत नाहीत. राष्ट्रवादीने शिवसेनेला डावललं की शिवसेनेने प्रचार थांबवला असा प्रश्न विचारला असता जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी, अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारखेच्या आत कुणी माघार घेइल का? याची वाट बघत होतो? असं मार्मिक उत्तर देत राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. उद्यापासून आपण प्रचारात सहभागी होणार असल्याचं सांगत सारवासारवही केली आहे.

वाचा - थेट दिल्लीतून सूत्र हलली, अन् दाभेकरांनी माघार घेतली, कसब्यात पडद्यामागे मोठ्या घडामोडी!

दुसरीकडे पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही आणि त्यामुळे आमदारकीचा आश्वासक चेहरा म्हणून आपल्याकडे बघणारे अनेक शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी देखील आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.

एकीकडे राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला लागलेलं ग्रहण सुटत नाही तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतही दोन गट पडलेत ज्याचा फटका नाना काटे यांना बसू शकतो. त्यामुळेच चिंचवड विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना नक्की कुणाच्या बाजूने आहे? याचा खुलासा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना करावा लागणार आहे.

First published:

Tags: Ajit pawar, NCP