इंदापूर, 13 जुलै : गावातील चौकातील गाळे (shops) देण्यास नकार दिल्याने तलवारीने तिंघावर वार केल्याची धक्कादायक घटना पुणे (pune) जिल्ह्यातील इंदापूर (indapur) तालुक्यातील बाभुळगावमध्ये (babhulgaon) घडली. गावाच्या उपसरपंच आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय उंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाभुळगावचे विद्यमान उपसरपंच नागनाथ गुरगुडे, सोमनाथ जावळे ( विद्यमान सरपंच यांचे पती ) नितीन भोसले, माऊली खबाले, स्वप्निल घोगरे अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
दत्तात्रेय उंबरे यांनी फिर्यादीत सांगितले की, 'आम्ही आमच्या अंगणात बसलो होतो, तेंव्हा नागनाथ गुरगुडे व सोमनाथ जावळे हे दोघे जण आले आणि म्हणाले की, 'बाभुळगाव चौकातील गाळे आम्हाला दे नाहीतर तुझा मर्डर करेल'. त्यावेळी नकार दिल्यानंतर या दोघांनी त्यांच्या हातातील तलवारीने फिर्यादी यांच्या डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. त्यावेळी त्यांनी दोन्ही वार वाचविण्यासाठी हातवर केले असता तलवारीचे वार त्यांच्या दोन्ही हातावर बसले. त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकून वाद सोडवण्यासाठी वडिल शहाजी उंबरे व चुलत भाऊ रामचंद्र उंबरे आले असता त्यांनाही इतर आरोपींनी तलावारीने मारहाण केली.
आरोपी नितीन भोसले याने फिर्यादीच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन आणि अर्धा तोळा सोन्याची अंगठी काढून घेऊन जात असताना कुटुंबातील सर्वांनाच करून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.
Explainer: 'एकच मूल' कायदा भारतात लागू झाला तर काय होतील परिणाम?
या हल्ल्यात दत्तात्रेय शहाजी उंबरे, शहाजी दशरथ उंबरे व रामचंद्र पोपट उंबरे हे जखमी झाले आहे. सोबतच भर दिवसा नंग्या तलवारी देखील नाचवल्याचे व्हिडीओमध्ये दिसतं आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.