पिंपरी -चिंचवड, 15 जुलै : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांमध्ये लहान मुलांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर आहे. पण, पिंपरी चिंचवडमधील पालिकेच्या रुग्णालयाने यावर मात केली आहे. या रुग्णालयात बाल मृत्यूचे दर हे शून्य आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपाली अंबिके यांच्या टीमने इथं अथक प्रयत्न करून आतापर्यंत तब्बल 175 कोरोनाबाधित बालकांना कोरोनामुक्त केलं आहे. शिवाय त्यांच्याच प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड मधील YCM रुग्णालयातील “बालरोग कोरोना वॉर्ड” हा कोरोनाबाधित शहरांपैकी ’ शून्य ’ टक्के बाल मृत्यू असलेला राज्यातील एकमेव रुग्णालय ठरलं आहे.
चिंताजनक! पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग, प्रशासनानं घेतला मोठा
पिंपरी-चिंचवड शहरातही मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ‘बालरोग कोरोना वार्ड’ची सुरुवात केली. हा वॉर्ड 26 एप्रिल 2020 रोजी सुरू झाला. एप्रिलमध्ये 13 कोरोनाबाधित बालकांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. त्यानंतर मे मध्ये 17, जून महिन्यात 102 तर जुलै 43 बालकांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वय वर्ष 1 ते12 वर्षपर्यंतच्या बालकांचा समावेश होता.
डॉ अंबिके यांनी सांगितले की, ‘बालरोग अतिदक्षता विभागात कोरोनाबाधित बालकांना त्यांच्या आईसोबत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात गेल्या 100 दिवसांमध्ये 175 मुलांनी कोरोनावर मात केली. यामध्ये एकही मूल दगावले नाही. लहान मुलांची प्रतिकारक्षमता आईच्या दुधामुळेच वाढते. त्यात मुलं आईच्या सानिध्यात राहिल्यास इन्फेक्शन वाढण्याची भिती कमी असते. मूलं दूर ठेवल्यास ते अस्वस्थ होते. रडून रडून त्याची प्रतिकार क्षमता कमी होते. त्यामुळे दाखल झालेल्या 80 टक्के मुलांची आई त्यांच्यासोबत बालरोग विभागात होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासोबत मातावरही कोरोना पॉझिटिव्ह समजूनच औषध उपचार करण्यात आले यातून मुले आणि माता दोघेही ठणठणीत होऊन घरी परतले. प्रत्येक आई आणि मुलांच्या 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळ घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दाखल झालेल्या मुलांमध्ये ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे होती. त्यामध्ये ताप असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते.’
डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक,मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा VIDEO
‘गेल्या तीन महिन्यात 16,12 आणि 5 दिवसांचे कोरोनाबाधित बालक दाखल झाले होते. नवजात शिशु विभागातून ही बालके आमच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यापैकी दोघांना प्लेटलेट कमी होऊन एकाला संडासाच्या जागेतून रक्त जात असल्यामुळे अतिजोखम म्हणतायेईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, चांगल्या आणि वेळीच उपचारांमुळे तिन्ही मुले अतिजोखमीच्या आजारातून बरे झाले’ असंही अंबिके यांनी सांगितलं. आयुक्तांनी केलं अभिनंदन बालरोग विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या निगराणीत आता केवळ 10 कोरोनाबाधित मुले उपचार घेत आहेत. सर्व निवासी डॉक्टर्स, स्टाफनर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांना कोरोना सारख्या महामारीतून पुनर्जन्म मिळाला असल्याच्या भावना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉक्टरांप्रति आभार व्यक्त केले आहेत. पिंपरी चिंचवड राज्यात एकमेव शहर! जगभरात सुरू असलेल्या संशोधनानुसार नवजात अर्भकांना कोविड-19 चा धोका असतो. कोविड-19 चं संक्रमण झालेल्या 10 पैकी एका अर्भकामध्ये गंभीर लक्षणं दिसत असली तरी वय वाढल्यानंतर हे प्रमाण फारच कमी होते. मात्र, तोपर्यत मृत्यूदर कमी करणे , शिथिल करणे महत्वाचे असते. त्यासाठी कोविड निवारणासाठी बालरोग विभाग अधिक सक्रिय असावा अशी शासनाची मार्गदर्शक तत्वे सांगतात. जगभरात 3-5 या वयोगटातल्या संक्रमण झालेल्या 100 पैकी फक्त 3-4 मुलांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित शहरांपैकी ’ शून्य ’ टक्के बाल मृत्यू असलेले पिंपरी चिंचवड राज्यात एकमेव आहे. ही गोष्ट वाखणण्यासारखी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.