सुरत, 26 ऑगस्ट : गुजरातच्या सुरत शहरात असणाऱ्या महावीर रुग्णालयात अवघड अशी हृदय प्रत्यारोपण (Surat Heart Transplant) शस्त्रक्रिया पार पडली. गुजरातच्या छोटा उदेपूर गावातल्या एका 35 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पुण्यातल्या एका 28 वर्षीय ब्रेन-डेड तरुणाचं हृदय बसवण्यात (Pune man’s heart transplanted into Gujarat man) आलं. सुरतमध्ये पार पडलेली ही पहिलीच आंतर-राज्यीय हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (First inter-state heart transplant in Surat) होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. तरुणाने मृत्यूनंतरही वाचवले अनेकांचे प्राण मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पिंपरीमधल्या एका तरुणाला ब्रेन-डेड (Pune brain dead man’s organs donated) म्हणून घोषित करण्यात आलं होतं. या तरुणावर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शरीराचे कार्यरत असलेले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या तरुणाच्या किडनीज, लिव्हर, हृदय, फुफ्फुसं आणि दोन्ही डोळे दान करण्यात आले. या माध्यमातून अनेक रुग्णांना फायदा झाला. अवघ्या दोन तासांत हृदय नेलं सुरतला शस्त्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी या तरुणाचं हृदय तातडीने सुरतला नेणं गरजेचं होतं. यासाठी पुणे पोलीस आणि सुरत पोलिसांची भरपूर मदत झाली. पोलिसांनी तयार केलेला ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor for heart transplant) आणि एका चार्टर्ड प्लेनच्या मदतीने अवघ्या 120 मिनिटांमध्ये हे हृदय पुण्याहून सुरतला पोहोचवण्यात आलं. ‘दिल’वालों की दिल्ली! 15 वर्षाच्या मुलीनं ऱ्हदय देऊन वाचवला महिलेचा जीव सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट (2022) रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. सुरतमधल्या महावीर रुग्णालयातले (Mahavir Hospital Surat) डॉ. जगदीश मांगे, डॉ. संदीप सिंह आणि डॉ. रोहित शेट्टी यांच्या पथकाने ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडली. ‘दिल’दार सुरत अवयवदानाच्या बाबतीत ही घटना एक मैलाचा दगड असल्याचे मत नीलेश मांडेलवाला यांनी व्यक्त केले. ते अवयवदानासंबंधी जनजागृती करणाऱ्या डोनेट लाइफ (Donate Life) या एनजीओचे सदस्य आहेत. “सुरतमध्ये 2015 साली पहिलं हृदय दान करण्यात आलं होतं. 57 वर्षांच्या जगदीश पटेल या व्यक्तीचं हृदय दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. हे हृदय नंतर प्रत्यारोपणासाठी मुंबईला नेण्यात आलं होतं. त्यानंतर आतापर्यंत संपूर्ण गुजरातमध्ये एकूण 65 हृदयं दान करण्यात आली आहेत. यांपैकी 40 हृदयांचं दान एकट्या सुरतमधून करण्यात आलं आहे,” अशी माहिती मांडेलवाला यांनी दिली. सुरतमध्येही आता हृदय प्रत्यारोपण करणं शक्य झाल्यामुळे नीलेश यांनी समाधान व्यक्त केले. याचा फायदा केवळ सुरतच नाही, तर संपूर्ण गुजरात राज्यातल्या नागरिकांना होणार असल्याचं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.