• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यातील धक्कादायक घटना, खडकवासला कालव्याजवळ आढळला चिमुकलीचा मृतदेह

पुण्यातील धक्कादायक घटना, खडकवासला कालव्याजवळ आढळला चिमुकलीचा मृतदेह

Pune : चिमुकलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

  • Share this:
पुणे, 26 मार्च: पुणे शहरानजीकच्या (Pune City) खडकवासला धरणाजवळ (Khadakwasla Dam) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धरणाच्या कालव्याजवळ असणाऱ्या झुडुपात एका चिमुकलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला आज सकाळी धरणापासून सुमारे दीड किलोमीटर लांब कालव्याच्या भरावावर असलेल्या झुडपांमध्ये पाच ते सात महिने वयाच्या चिमुकलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. झुडपातील हा सडलेला मृतदेह कुत्र्यांनी बाहेर ओढून काढल्याने आज सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. ही वार्ता पोलिसांना (Pune Police) कळताच पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. हा मृतदेह पूर्णपणे सडलेला असून शीर धडावेगळे झालेले होते. मृतदेहाजवळ चिमुकलीच्या दुधाची बाटली पडलेली होती. चार-पाच दिवसांच्या अगोदर हा मृतदेह झुडपात टाकलेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी चालण्यासाठी आलेल्या नागरिकांनी चिमुकलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पडलेला असल्याची माहिती कालव्यावर पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना दिली. हेही वाचा - पुण्यात दुचाकीवरून जाणाऱ्या सराफाकडून 9 लाखांचा मुद्देमाल लुटला; लाथ मारून पाडली गाडी याबाबत कळताच खडकवासला येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल सरवदे यांनी तात्काळ ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, होमगार्ड जवान शांताराम राठोड, प्रवीण घुले, सत्यम काळे खडकवासला गावचे पोलीस पाटील ऋषिकेश मते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील अजूनही मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. अशातच हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्याने शुक्रवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वत: घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथं काही पुरावे मिळत आहेत का, याची तपासणी करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण या चिमुकलीचा मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने तिची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांवर उभं ठाकलं आहे. हा परिसर बऱ्यापैकी निर्जन असल्याने हे कृत्य नेमकं कोणी केलं असावं, तसंच हा मृतदेह टाकताना स्थानिकांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यात का? याची चौकशी हवेली पोलिसांनी सुरू केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: