पुणे, 26 मार्च: पुण्याच्या शिरुर तालुक्यातील वडगांव नागरगाव रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या एका सराफाला लुटल्याची घटना समोर आली आहे. पाठीमागून आलेल्या तीन चोरट्यांनी संबंधित सराफाला (Gold trader) निर्जन स्थळी अडवून त्यांच्या जवळचा 9 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास (Theft) केला आहे. जयंतीलाल कांतीलाल ओसवाल असं पीडित सराफाचं नाव असून त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पण याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. फिर्यादी जयंतीलाल ओसवाल हे सोन्याचे व्यापारी आहेत. ते परिसरातील सराफांना सोन्याचे दागिने पुरवठा करण्याचं काम करतात. 25 मार्च रोजी फिर्यादी नेहमीप्रमाणे सकाळी उरुळी कांचन येथून दागिने घेऊन दुचाकीवरून निघाले होते. त्यानंतर काष्टी येथील काम संपवून ते तांदळी मांडवगण फराटा या रस्त्याने पुढील कामासाठी जात होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवर तीन अज्ञात चोरटे आले. त्यांनी फिर्यादी ओसवाल यांच्या दुचाकीला लाथ मारली. यावेळी जयंतीलाल यांनी अज्ञातांना हुलकावणी दिली. पण काही अंतर पुढे गेल्यानंतर ते काटेरी झुडपात पडले. तेव्हा संबंधित बाईकवर पाठीमागे बसलेला अज्ञात व्यक्ती जयंतीलाल ओसवाल यांच्याजवळ आला आणि त्याने ‘बॅग दे’ नाहीतर, तुला गोळी मारेन असं धमकावयाला सुरुवात केली. तसंच आरोपीने ओसवाल यांना हाताने मारण्याचा प्रयत्नही केला. यावेळी ओसवाल यांनी पायातील चप्पल सोडून पळायला सुरुवात केली. पण अज्ञात इसमाने ओसवाल यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीवरील सॅक ओढली. सॅकचा बेल्ट तुटल्याने मुद्देमालाने भरलेली बॅग चोरट्याच्या ताब्यात गेली. त्यानंतर संबंधित चोरटे वडगांव रासाई गावाच्या दिशेने पळून गेले. (वाचा - सांगलीजवळ कृष्णा नदीत आढळला नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय ) यावेळी चोरट्यांनी ओसवाल यांच्या बॅगेत प्लॅस्टिकच्या आणि कापडी पिशवीत ठेवलेले सुमारे 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या मुद्देमालाची एकूण किंमत 9 लाख 20 हजार रुपये एवढी आहे. या घटनेनंतर ओसवाल यांनी शिरूर पोलीस स्टेशनला धाव घेत, अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिरूर पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.