शिवनेरी, 19 फेब्रुवारी : 'छत्रपती शिवाजी महाराजांना इंगित विद्या भाषा येत होती ते डोळ्यांनी संकेत देत असायचे. तीच भाषा अजितदादांना चांगलीच अवगत आहे, आता मी पण ती भाषा विद्या शिकून घेणार आहे. कारण मला पण दादांच्या मनात काय चाललंय हे मला कळलं पाहिजे,' अशी मिष्किल टोलेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी किल्ले शिवनेरी गडावरचं भाषण चांगलंच फुलवलं.
एवढंच बोलून मुख्यमंत्री थांबले नाहीत तर, दादांनी मास्क घालू दे, गॉगल घालू दे तरीबी मी त्यांच्या मनात काय चाललंय ओळखून दाखवेलच, असा दृढनिश्चयही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. उपमुख्यमंञी अजित पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या या राजकीय टोलेबाजीला मास्कमधूनच हसत खळखळून दाद दिली. राजकारण काहीही असो, पण सर्वांच्या मनात शिवधागा कायम आहे, आणि छत्रपतींच्या किल्ल्यांसाठी खूप काही करायचं आहे आणि ते मी करेलच असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.
खरंतर आजची शिवजयंती ही कोरोना सावटाखाली साजरी झाल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंञी या दोघांनीही मास्कच्या सक्तीवर जोर दिला. शिवाजी महाराज त्याकाळी मोगलांशी ढाल-तलवारीने लढायचे पण आजच्या घडीला आपल्या सर्वांसाठी कोरोनाशी लढताना मास्क हीच आपली 'ढाल' असल्याचं मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा - अधिवेशनाआधी कोरोनाच्या टार्गेटवर मंत्री, विधान परिषदेच्या सभापतींनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्त्वाची मागणी
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यानच मास्क न लावलेल्या एका महिला शिवप्रेमीला मास्क घालण्याची देखील आठवण करून दिली.
शिवनेरीवरील शिवजयंतीच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेचे युवा नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंना गड फिरवतानाच तिथली माहितीही आवर्जून सांगितली. एकूणच शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे पिता पुत्र आणि अजितदादा यांच्यातलं ट्युनिंग छान जमल्याचं बघायला मिळालं. पण अजितदादांच्या मनातलं ओळखण्याचा संदर्भ देताना मुख्यमंञी उद्धव ठाकरेंना नेमकं काय सुचवायचं हे मात्र राजकीय जाणकारांना नक्कीच उमगलं असणार. कारण अजितदादांचा फडणवीसांसोबतचा अल्पजीवी ठरलेला शपथविधी लोक अजूनही विसरलेले नाहीत. किंबहुना त्यामुळेच ठाकरेंना अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललंय? हे वेळोवेळी जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असावी.