पुणे, 06 मार्च : 'कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती याच्याबद्दल ते चांगले बोलत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
पुण्यात कसबाचा गड काबीज केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी धंगेकरांचा सत्कार केला.
भाजपचा कसब्याचा गड ढासळला आहे. चांगली गोष्ट आहे, विजयी उमेदवार हे आमच्या सर्वांचे होते, हे त्यांनी मान्य केलं हे चांगलं झालं. निवडणुकीच्या आधी त्यांची विधान काय होती, भाषणात काय होती. कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती याच्याबद्दल ते चांगले बोलत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असा टोला पवारांनी फडणवीसांना लगावला.
'धंगेकरांना यश मिळेल असं लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण माझ्या मनात शंका होती. कारण नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ. याच्या खोलात जायची गरज नाही. परंतू गिरीष बापटांनी कसब्यात सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध ठेवले. त्यामुळे कसबा इतके दिवस अवघड होता. पण यावेळी भाजपने बापटांना विश्वासात घेतलं की नाही माहित नाही पण धंगेकरांनी ही जागा काढली, असंही पवार म्हणाले.
('हिंमत असेल तर....', मोदींचं नाव घेत ठाकरेंनी भाजप-शिंदेंना दिलं चॅलेंज)
कारण हा उमेदवार टू व्हिलरवर फिरणारा होता. तो कधी कारमध्ये बसत नाही. लोकांमधला होता. त्याचा निश्चितच फायदा झाला, हा विजय महाविकास आघाडीला उभारी देणारा आहे. महाविकास आघाडीचे सगळे घटक राबले त्याचा हा फायदा झाला आहे, असंही पवार म्हणाले.
'पंतप्रधानांना नऊ विरोधी पक्षांनी जे पत्र लिहिलंय त्यामधे सर्वात पहिली सही माझी आहे. केजरीवाल यांच्या सरकारने शाळांसाठी जे काम केलंय ते पाहण्यासाठी लोक बाहेर येत आहे. राहुल गांधींनी परदेशात जाऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यात चुकीचे काय आहे, असंही पवार म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, 'शहाण्या माणसाबद्दल विचारा' असं म्हणत शरद पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
'उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे. कारण आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच भुमिका मांडत आहे आणि या तीन पक्षाची ताकद कालच्या सभेत दिसली, असं म्हणत पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तर दिलं.
('शरद पवार-गो बॅक' अहमदनगरमध्ये कुणी केली घोषणा, काय आहे प्रकरण?)
'उद्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एकत्र ठेवणे, एकत्रित निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काळजी घेणार आहे. लोकांना आता बदल हवा आहे. संजय राऊत हे पत्रकार आहे, त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो, माझा इतका अभ्यास नाही. लोकांना आता बदल हवा आहे. लोकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे, असंही पवारांनी सांगितलं.
आता लगेच उपाययोजना केली जाणार नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आम्ही बोलणार आहोत, काँग्रेस नेते, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व घटकपक्षांसोबत चर्चा करणार आहोत. मी लोकांना विचारलं आहे, महाराष्ट्रात बदल हवा आहे, असं म्हणत आगामी काळात महाविकास आघाडी एकत्र लढणार असे संकेत पवारांनी दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.