गणेश दुडम, प्रतिनिधी पुणे, 18 एप्रिल : देहूत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कीर्तनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं देहूतील त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोप सोहळा. या सोहळ्याला शरद पवार यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांनी कीर्तन सुरू होताच एकाग्रतेने ऐकत ते तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शरद पवार यांच्यावर कीर्तनकार उल्हास पाटील यांनी स्तुतीसुमने उधळत पवारांवर अभंग सादर केला. शरद पवार हे शेतकऱ्यांचे पांडुरंग असे सांगत त्यांनी पवारांचे कौतुक केले. शरद पवारांनी देखील ह्या अभंगाला दाद दिली आहे. यावेळी शरद पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं. काय म्हणाले शरद पवार? मला पुढं एका कार्यक्रमाला साडेसात वाजता पोहचायचे आहे, त्यामुळं वेळे अभावी मी मध्येच बोलायला उभं राहतोय. देवधर्म, पूजाअर्चा या नावाखाली काही वर्गाची फसवणूक होत आहे. फसवणूक करणाऱ्या वर्गाचा मुखवटा समोर आणायला हवा. संतांनी जी शिकवण दिली आहे, ते सामान्य लोकांसमोर मांडायला हवी. त्यामुळं समाजातील कटुता कमी होईल. आज पूजा कोणाची करायची याबाबत आपण चर्चा करतो? तुकोबांनी सांगितलं आहे की तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या उपेक्षितांची पूजा अर्चा करा, तेंव्हाच तुम्हाला सिद्धी मिळेल। खरा कष्टकरी, सामान्य माणसाला योग्य तो सन्मान द्यायला हवा. हीच शिकवण समाजाला द्यायला हवी.
Video : देहूत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कीर्तनात तल्लीन..#sharadpawar #pune pic.twitter.com/uaP9d1yJrX
— News18Lokmat (@News18lokmat) April 18, 2023
समाजात घडणाऱ्या घटनांना आळा घालायचा असेल तर संतांचे विचार प्रबोधनातून मांडण्याचा वसा हाती घ्यायला हवा. सामान्य माणसाला तुकोबांच्या अभंगाचा अर्थ कळायला हवा. असं मी गाथा परिवार आणि त्यांच्या सोबतीच्या आयोजकांना सांगितलं, ते म्हणाले आम्हाला तीन महिने द्या. या कालावधीत त्यांनी प्रशिक्षण घेत, उत्तम प्रकारे मांडणी केली हे आज आपण पाहिलं. आता इथंच थांबायचं नाही, हे अखंडितपणे सुरू ठेवा. त्या दृष्टीने आपली पावलं टाका. वाचा - ‘शुगर वाढली त्यामुळे ऑपरेशन…’, म्हणून शमलं अजितदादांचं बंड? शाहू महाराजांचा एकाने उल्लेख केला. त्यांच्या हातातील सत्ता ही जनतेची सत्ता असा नेहमी उल्लेख केला. एकदा कर्नाटकचे ज्ञानी माणूस येत आहेत, असं त्यांना सरदारांनी सांगितलं. त्या ज्ञानी माणसाकडे उद्या काय होणार याची त्यांना कल्पना असते, तेंव्हा तुम्ही त्याला भेटाच असा आग्रह सरदारांनी केला. ते ज्ञानी आले आणि म्हणाले मला पोलिसांनी पकडलं आणि मारलं. मग महाराज म्हणाले अरे तू माझं भविष्य सांगणार होता, पण तुलाच तुझी काय अवस्था होणार याची कल्पना नव्हती. मग तू माझ कसं काय भविष्य सांगणार होता. खरं तर तुला अद्दल घडवण्यासाठी मीच पोलिसांना तुझ्यासोबत असं करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे शाहू महाराजांनी अंधश्रद्धा पसवणाऱ्यांचं पितळ उघडे केलं. हेच कार्य आपल्याला करायचं आहे. हा वसा हाती घ्या, असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थितांना केलं.
देवधर्म, पूजा अर्चा या नावाखाली काही वर्गाची फसवणूक होत आहे. फसवणूक करणाऱ्या वर्गाचा मुखवटा समोर आणायला हवा. संतांनी जी शिकवण दिली आहे, ते सामान्य लोकांसमोर मांडायला हवी. त्यामुळं समाजातील कटुता कमी होईल. आज पूजा कोणाची करायची याबाबत आपण चर्चा करतो? तुकोबांनी सांगितलं आहे की तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या उपेक्षितांची पूजा अर्चा करा, तेंव्हाच तुम्हाला सिद्धी मिळेल. खरा कष्टकरी, सामान्य माणसाला योग्य तो सन्मान द्यायला हवा. हीच शिकवण समाजाला द्यायला हवी. देहूत त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोपाच्या सोहळ्यात शरद पवार बोलत होते.

)







