पुणे, 23 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसचा (Corornavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन (Lockdown) लागू झाल्यानंतर जगभरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हळूहळू अनेक सेवा पूर्ववत होत आहे. दरम्यान बंद करण्यात आलेले पुण्याच्या (Pune) ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी पुन्हा उघडण्यात आले. राज्यात अनेक पालक शाळा सुरू करण्याचा विरोध करीत आहेत. त्यामुळे अनेकजण अद्यापही आपल्या पाल्याला शाळेत पाठवित नसल्याचे दिसून आले. दरम्यान अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार हजेरी अजूनही 30 टक्के आहे.
जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी गणपत मोरे म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1200 हून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. ते म्हणाले, मी काही शाळांना भेट दिली आणि मला दिसलं की विद्यार्थ्यांची उपस्थिती सुमारे 30 टक्के इतकीच आहे. महासाथीमुळे मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांशी मी याबाबत संपर्क केला. ते मुलांच्या सुरक्षेसाठी चिंतेत आहे. मात्र या सर्व शाळांमध्ये कोविड - 19 च्या नियमांचे पालन केले जात आहे.
हे ही वाचा-1020 किमी लांब...3700 कोटी खर्च; पंतप्रधान देणार सर्वात मोठ्या एक्सप्रेसवेची भेट
शिक्षक आणि इतर कर्मचार्यांची तपासणीही केली जात आहे. मोरे पुढे म्हणाले की, शनिवारपर्यंत 4700 हून अधिक शिक्षकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. आणि 13 जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र संसर्गाची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत नव्हती.
9 वी ते 11 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोरोना विषाणूच्या साथीमुळे या निर्णयाचा आढावा घेण्यात येत आहे. शाळेचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंगदेखील करण्यात येईल. त्यांची ऑक्सिजनची पातळीही ऑक्सिमीटरवर तपासली जाईल. महत्त्वाचे म्हणजे कोविड -19 ची चाचणी करणे शिक्षकांनाही बंधनकारक केले जाईल. पीएमसी प्रभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्या जात आहेत की नाहीत याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.