पिंपरी-चिंचवड, 12 मार्च:पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरसचे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, वाढीव दराने मास्क आणि सॅनिटाइझर विकणाऱ्या पुण्यातीस चार मेडिकल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. चारही मेडिकल स्टोअर्सना औषधी खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
हेही वाचा..कोरोना व्हायरसवर विकसित केली लस, इस्रायलमधील शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश
सहआयुक्त सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची लागन होऊ नये, यासाठी नागरिक मेडिकलमधून सॅनिटायझर आणि मास्क खरेदी करत आहेत. मात्र, अनेक मेडिकल वस्तूंची दुप्पट किंमत वसूल करत नागरिकांची लूट करत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच नागरिकांकडूनही तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन अनेक मेडिकल स्टोअर्सवर छापा टाकण्यात आला. बनावट उत्पादनेही विकले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध विभागाने कारवाईसाठी पथकाने चार मेडिकल स्टोअर्स टाळं ठोकण्यात आलं आहे.
हेही वाचा..Coronavirus वाढला; पुण्यात अमेरिकेहून आलेला एक जण पॉझिटिव्ह; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 12
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत तब्बल 165 मेडिकल्सची तपासणी करून त्या पैकी कोथरूड परिसरातील न्यु पूजा मेडिकल आणि मेट्रो मेडिकल तर गोखले नगर परिसरातील ओम केमिस्ट् आणि म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकल ह्या चार मेडिकल्सना खरेदी-विक्री करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहे. अशा वाढीव दराने कुणी मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करत असल्यास त्यांनी त्वरित अन्न व औषध विभागाशी संपर्क साधवा. संबधित मेडिकलवर छापा टाकून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही पाटील यांनी दिलं आहे.
संत तुकाराम महोत्सव पुढे ढकलला..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला "संत तुकाराम महोत्सव" कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. 13 ते 15 मार्च 2020 दरम्यान भांडारकर संस्थेत हा कार्यक्रम होणार होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून तो अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख प्रा. सदानंद मोरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news