पुणे, 27 ऑगस्ट: सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील शिवाजी रस्त्यावर घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा… राज्यात धार्मिकस्थळं, जीम सुरू होणार; संजय राऊत यांनी दिले संकेत! याप्रकरणी प्रकाश जयकुमार बुरले (वय-58) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी प्रकाश बुरले यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून नेला आहे. दरम्यान, बुरेल यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरट्यांनी पळ काढला. बुरले नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास बुरले शिवाजी रस्त्यावरून चालत निघाले होते. त्यावेळी घनश्याम लॉजजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी बुरले यांना धमकावले. त्यांचा मोबाइल हिसकावला. दरम्यान, बुरले यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी बुरले यांच्या हातावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. हा सर्व प्रकार रस्त्यावरील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात बुरले किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. बुरले यांनी त्वरीत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून पुढील तपास खडक पोलिस करत आहेत. धक्कादायक! पुण्यात आता देवच नाही सुरक्षित राज्यात लॉकडाऊन असल्याने मंदिरं बंद आहेत. याचाच फायदा घेत चोरटे मंदिरामधील दागिन्यांवर डल्ला मारत असल्याचं उघड होत आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असलेल्या आणे गावात कालिका माता मंदिरात भरदिवसा चोरी करत चोरट्यांनी दागिने लंपास केले आहेत. बरोबर महिनाभरापूर्वी ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा आणे इथल्या कालिका माता मंदिरात चोरी झाल्याने राज्यातील देव सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झाले आहे. देवीच्या अंगावरचे दागिने आणि मुकुट चोरीला गेला आहे. कालिका देवीचे पुजारी साईनाथ सासवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 25 रोजी दुपारच्या सुमारास आणे इथल्या खालच्या पेठेत असलेल्या कालिका देवीच्या मंदिरात प्रवेश करून देवीचा 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व देवीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. हेही वाचा… SSR Case: रिया चक्रवर्तीनं Instagram वर शेअर केला व्हिडीओ, म्हणाली… मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व गाभारा अशा दोन्ही दरवाजांना असलेली कुलपं शाबूत असून चोरट्याने गाभाऱ्याला असलेल्या झरोक्यातून आत प्रवेश करून चोरी केल्याचे साईनाथ सासवडे यांनी सांगितले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पोलिसात तक्रार दिली असून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.