मराठी बातम्या /बातम्या /पुणे /...म्हणून पुणेकर जगात भारी; EcoKaari वस्तूंची जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेतही निर्यात

...म्हणून पुणेकर जगात भारी; EcoKaari वस्तूंची जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेतही निर्यात

पुण्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या या वस्तूंची जगभरात मागणी आहे.

पुण्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या या वस्तूंची जगभरात मागणी आहे.

पुण्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या या वस्तूंची जगभरात मागणी आहे.

  पुणे, 30 जुलै : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) 2019मधल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात दररोज दरडोई सुमारे 8 ग्रॅम एवढ्या प्लास्टिकची निर्मिती होते. म्हणजेच भारतात दर वर्षी 33 लाख मेट्रिक टन एवढ्या प्लास्टिकची (Plastic) निर्मिती केली जाते. दुसऱ्या एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगात उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी 80 टक्के प्लास्टिक आपल्या वातावरणात प्रवेश (Plastic Waste) करतं. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं, की पर्यावरणासाठी (Environment) प्लास्टिक किती घातक आहे. काही द्रष्ट्या व्यक्तींनी मात्र ही समस्या ओळखून त्यावर मात करण्यासाठी काही एकमेवाद्वितीय, सर्जनशील उपाय शोधून काढले आहेत. अशाच प्रकारचा एक नावीन्यपूर्ण पर्याय अलीकडेच समोर आणला आहे तो पुण्यातल्या इकोकारी या सोशल एंटरप्रायझने (Social Enterprise).

  टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून आकर्षक वस्तू तयार करण्याचा उद्योग 'इकोकारी'तर्फे (EcoKaari) सुरू करण्यात आला आहे. हँडबॅग्ज, फॅशन अॅक्सेसरीज, स्टेशनरी उत्पादनं, ऑफिससाठी आवश्यक उत्पादनं आणि घराच्या सजावटीसाठी आवश्यक उत्पादनं आदी वस्तूंची निर्मिती याअंतर्गत केली जाते. लाकडी चरख्याला (Charakha) स्वदेशी संस्कृतीचा ब्रँड म्हणून ओळखलं जातं. या चरख्याचा वापर प्लास्टिकच्या प्रक्रियेसाठी केला जातो, ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे.

  पर्यावरण संरक्षणाचं उद्दिष्ट साध्य करतानाच दुर्गम, ग्रामीण भागातले तरुण आणि महिला कलाकारांना (Rural Artisans) रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने नंदन भट (Nandan Bhat) याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली. प्लास्टिक प्रदूषणाच्या (Plastic Pollution) घातक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देशही त्यामागे होता.

  विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकपासून धाग्याची निर्मिती (Plastic to fabric) करून त्यापासून उत्पादनांची निर्मिती केली जाते. पॉलिथिन बॅग्ज, कुकीज, चिप्स, डिटर्जंट आदींच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे अनेक थरांचे रॅपर्स, गिफ्ट रॅपर्स, ब्रेड पॅकेट्स, बबल रॅप, ऑडिओ-व्हिडिओ कॅसेट टेप्स आदी प्रकारच्या प्लास्टिकचा वापर धाग्यांच्या निर्मितीसाठी केला जातो. तेल आणि दुधाच्या पिशव्या, स्ट्रॉ, सॉस तसंच शाम्पूचे छोटे सॅशे, सीडी आदी प्रकारच्या प्लास्टिकचा वापर त्यासाठी केला जात नाही.

  खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या छोट्या कंपन्या, तसंच प्लास्टिक कचरा उचलणाऱ्यांसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून 'इकोकारी'ला टाकाऊ प्लास्टिक मिळतं. अशा स्वयंसेवी संस्थांशी सहयोग केल्यामुळे उत्पन्नाचा आणखी एक स्रोत तयार होतो. घरातच प्लास्टिकचा कचरा विलग करणाऱ्या जागरूक नागरिकांकडूनही अशा स्वयंसेवी संस्था प्लास्टिक गोळा करतात.

  हे ही वाचा-'पुणेकरांना त्रास नको म्हणून...'', असं का म्हणाले अजित पवार

  अशा सगळ्या स्रोतांमधून प्लास्टिक गोळा झाल्यानंतर ते पाण्याने आणि अनेक प्रकारच्या क्लीन्सर्सच्या (Cleansers) साह्याने स्वच्छ केलं जातं. त्यानंतर स्वच्छ झालेलं प्लास्टिक वाळवलं जातं आणि कापून त्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. त्या पट्ट्या पारंपरिक चरख्यावर विणून त्यापासून वस्त्रांची निर्मिती केली जाते. ही वस्त्रं नंतर डिझायनर्स आणि टेलर्सकडे जातात आणि त्यांच्याकडून त्यामध्ये जान ओतली जाते. म्हणजेच त्यापासून वेगवेगळी उत्तमोत्तम उत्पादनं तयार केली जातात. या सगळ्या प्रक्रयेत कुठेही रसायनं, वीज आणि उष्णतेचा वापर केला जात नाही. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया इको-फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक आहे.

  'इकोकारी'ने एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत दोन लाखांहून अधिक प्लास्टिक पिशव्या-रॅपर्सचा पुनर्वापर (Upcycled) करून उत्पादनांची निर्मिती केली आहे. या उत्पादनांच्या निर्मितीमुळे आतापर्यंत 22 ग्रामीण कलाकारांच्या हाताला काम मिळालं असून, पुढील वर्षाअखेरीपर्यंत ही संख्या 50 पर्यंत नेण्याचं नियोजन आहे. दुबई, फ्रान्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, सिंगापूर, अमेरिका आदी देशांमध्ये 'इकोकारी'चे निर्यात भागीदार आहेत. म्हणजेच या देशांमध्ये या उत्पादनांची निर्यात केली जाते.

  इथून पुढच्या काळात तुम्ही जेव्हा प्लास्टिकची एखादी रिकामी पिशवी कचऱ्यात टाकणार असाल, तेव्हा असा कचरा 'इकोकारी'ला किंवा अशा अन्य कोणत्या उपक्रमांना देता येईल का, याचा जरूर विचार करा.

  First published:
  top videos

   Tags: Business, Environment, Pune