पुणे, 27 मे: शिवसेना (Shivsen) सभापतीनं पुण्यातील सिंहगडमधल्या एका हॉटेलवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. तसंच राजकीय वादातून 40 ते 50 गुंडांसह गोळीबार करत सशस्त्र हल्ला केल्याचं समजतंय.
पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी सिंहगड परिसरात असलेल्या खडकवासला गावच्या हद्दीत एका हॉटेलवर हल्ला केला. राजकीय वादातून हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत खेड पंचायत समितीच्या महिला आणि पुरुष सदस्यांना तसंच महिला सदस्यांच्या पतींना देखील गंभीर दुखापत झाली आहे. हॉटेलवर झालेल्या या हल्ल्यामुळे हवेली पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत.
राजकीय वादातून हल्ला
शिवसेनेच्याच असलेल्या खेड पंचायत समिती सदस्या सुनिता संतोष सांडभोर यांनी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे 24 मे रोजी सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. या अविश्वास ठरावावर येत्या 31 मे ला मतदान होणार आहे.
पोखरकर यांच्यावर याआधी बरेच गंभीर गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे पोखरकर यांच्या दहशतीला घाबरुन खेड पंचायत समितीतील शिवसेनेचे 6 सदस्य, भाजपचे एक सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य सिंहगड परिसरातील एका हॉटेलवर आपल्या परिवारासह येऊन थांबले होते.
हेही वाचा- कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा नवा निर्णय, वाचा सविस्तर
भगवान पोखरकर काल रात्रीपासूनच गुंडांसह या सर्व सदस्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भगवान पोखरकर आणि त्यांनी आणलेल्या गुंडांनी हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. पोखरकर यांच्या गुंडांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या महिला पंचायत समिती सदस्यांच्या रुमचे दरवाजे तोडले. त्यानंतर महिला सदस्यांसह त्यांच्या पतींना कोयता, गज आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर पोखरकर यांनी सखाराम शिंदे, संतोष सांडभोर आणि प्रसाद काळे यांचं अपहरण केलं आणि त्यांना जबर मारहाण करुन नांदेड- शिवणे पुलाजवळ सोडून दिलं. हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीमध्य कैद झाला आहे. सीसीटीव्हीनुसार, भगवान पोखरकर यांचा भाऊ जालिंदर पोखरकर यानं पिस्तुलनं हवेत गोळीबार केल्याचं दिसतेय.
हेही वाचा- काय सांगता! तिसऱ्या लाटेपूर्वीच 30 टक्के लहान मुलांना होऊन गेला कोरोना?
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले. त्यांनी या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सध्या सुरु आहे.
हवेली पोलिसांच्या नाकाबंदीवर प्रश्नचिन्ह
रात्री संचारबंदी असताना देखील भगवान पोखरकर आणि त्यांचे गुंड शस्त्रांसह हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत होते. त्यामुळे हवेली पोलिसांची नाकाबंदी नेमकी काय करत होती? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune