मोठी बातमी! पुण्यातील शाळा 14 मार्चपर्यंत राहणार बंद, संचार बंदीबाबतही महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! पुण्यातील शाळा 14 मार्चपर्यंत राहणार बंद, संचार बंदीबाबतही महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुण्यातील शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस आज 28 फेब्रुवारीपर्यंत बंद होते. आज याबाबतीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

  • Share this:

पुणे, 28 फेब्रुवारी: कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुण्यातील शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस आज 28 फेब्रुवारीपर्यंत बंद होते. त्याचप्रमाणे रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी देखील होती. तरी देखील शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शहरातील कोरोनाचे संक्रमण रोखण्याासाठी पालिका प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्याचे महापौर यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीबद्दल आणि त्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ  यांनी असे म्हटले आहे की, 14 मार्चपर्यंत या शहरातील सर्व महाविद्यालयं, शाळा कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात येत आहेत. शिवाय रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत जे संचार निर्बंध आहेत, ते देखील 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखता येईल, त्यावर नियंत्रण ठेवता येईल या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर म्हणाले.

दरम्यान पुण्यातील मंदिरांवर देखील कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचं लक्षात घेवून राज्यसरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagadusheth halwai Ganpati temple) 2 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे, असे असले तरीही खबरदारीसाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घ्यावं, असे आवाहन केलं जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी   www.dagdushethganpati.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 28, 2021, 1:31 PM IST

ताज्या बातम्या