पुणे, 10 जुलै: पुणेकरांना (Pune) आता लवकरच मेट्रोतून (Metro) प्रवास करता येणार आहे. गुरुवारी रात्री पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. (Pune metro trial run) मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. दोन महिन्यात वनाज ते गरवारे महाविद्यालया दरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो उपलब्ध व्हावी, यासाठी महामेट्रोनं आपल्या कामाची गती वाढवली आहे.
मेट्रो ट्रॅकचं काम आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या काळात तीन स्थानकांची रखडलेली कामं पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वनाज-रामवाडी मार्गावर महामेट्रोने वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान 3 किलोमीटर अंतरावर मेट्रोची तांत्रिक चाचणी घेतली. या चाचणी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
ही चाचणी अधिकृत नव्हती. मात्र अधिकाऱ्यांनी ट्रायलच्या पूर्वीचा एक टप्पा म्हणून ही चाचणी घेतल्याचं समजतंय. या चाचणीमध्ये ट्रॅक, ओव्हरहेड केबल, सिग्नल, व्हाया डक्ट इत्यादींची तपासणी करण्यात आली.
पुणेकरांना आता लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार, मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. pic.twitter.com/7QaxFxk7j2
— News18Lokmat (@News18lokmat) July 9, 2021
ट्रॅकवरून मेट्रो धावत असताना या पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठीच मेट्रोचा वेग अगदी ताशी 20 किलोमीटरपेक्षा कमी ठेवण्यात आला होता. सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो मार्गाची पाहणी झाली. या पाहणीच्या वेळी पाच विभागांचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. सकाळनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
गुरुवारी रात्री पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो ) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. pic.twitter.com/xEvlRnf60a
— News18Lokmat (@News18lokmat) July 9, 2021
महामेट्रोनं एप्रिल महिन्याच्या शेवटी वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी प्रत्येकी 3 डब्यांच्या दोन रेल्वेगाड्या नागपूरहून पुण्यात आणल्या. रेल्वेगाड्यांचे डबे वनाज इथल्या मेट्रोच्या यार्डातचं उतरवण्यात आले. त्यांची जुळणी ट्रॅकवर करण्यात आली. त्यानंतर ट्रायलसाठी गुरुवार निश्चित केला आणि चाचणी घेण्यात आली.
चाचणीची तयारी आठ दिवसांपूर्वीच
आठ दिवसांपूर्वीच वनाज-रामवाडी मार्गावर वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची चाचणी घेण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. नियोजनानुसार त्याची तयारी सुरु होती. ट्रॅक, ओव्हरहेड केबल, रेल्वे डबे, सिग्नलिंग आणि व्हाय डक्टची उभारणी करणारा विभाग, असे पाच विभागांतील अधिकारी चाचणीदरम्यान उपस्थित होते. चाचणी घेण्याआधी पाचही विभागांनी पाहणी केली आणि त्या त्या विभागानुसार ग्रीन सिग्नल मिळाली. त्यानंतर मेट्रोची चाचणी निश्चित करण्यात आली.
हेही वाचा- केवळ 'या' दोन राज्यांमुळे देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट?
सप्टेंबरपर्यंत कामं पूर्ण होणार?
सध्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, एसएनडीटी आणि गरवारे महाविद्यालय येथील मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू आहे. आता पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी वनाज, आयडियल कॉलनी आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांची कामे पूर्ण करण्यावर महामेट्रोनं लक्ष केंद्रित केलं आहे. 60- 70 टक्के या स्थानकांची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. फरशी बसवणं, सरकते जिने उभारणे, लिफ्ट बसविणे, अंतर्गत सजावट आणि फर्निचर, प्लॅटफॉर्म उभारणे ही कामे सुरू असून येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सोनवणे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune metro