मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Holi 2023 : पुण्यात होळी खेळताय तर सावधान, हुल्लडबाजांवर असणार पुणे पोलिसांची करडी नजर

Pune Holi 2023 : पुण्यात होळी खेळताय तर सावधान, हुल्लडबाजांवर असणार पुणे पोलिसांची करडी नजर

पुण्यात महिलांना सुरक्षित वातावरणात होळी खेळता यावी यासाठी विशेष उपाययोजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

पुण्यात महिलांना सुरक्षित वातावरणात होळी खेळता यावी यासाठी विशेष उपाययोजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी देशभरात मोठ्या उत्साहानं तयारी सुरू आहे.

पुणे, 04 मार्च : फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी देशभरात मोठ्या उत्साहानं तयारी सुरू आहे. संपूर्ण देशभरात स्थानिक प्रथा-परंपरांनुसार होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी महाराष्ट्रामध्ये 6 मार्चला तर उत्तर भारतात 8 मार्च रोजी होळी साजरी होणार आहे. या दिवशी देशभरात गुलाल आणि रंगांची उधळण होईल. होळीचा सण तरुणांच्या विशेष आवडीचा आहे.

कारण, या दिवशी रंग, पिचकारी आणि पाण्याचे फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून घेऊन मजा करणं तरुणांना आवडतं. पण, या आनंदाच्या सणात काही स्त्रियांना मनस्ताप सहन करावा लागतो. ठिकठिकाणी रंग खेळण्यासाठी जमलेल्या अनेक स्त्रिया आणि मुलींशी गैरवर्तन होतं. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी खास होळीसाठी महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोणत्याही महिलेशी गैरवर्तणूक झाल्यास ती या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकते. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Holi 2023 : यंदा रंगपंचमीला घरीच बनवा नैसर्गिक रंग, पाहा काय आहे पद्धत? Video

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी मान्य केलं की, दरवर्षी होळीच्या उत्सवादरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला लैंगिक अत्याचार, छळ आणि इतर गुन्ह्यांची तक्रार करणाऱ्या अनेक महिलांचे कॉल येतात. त्यामुळे पोलीस विभागानं होळीच्या पार्ट्या आयोजित करण्याची परवानगी देताना, आयोजकांसाठी अनेक गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाइन्समध्ये महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी होळी पार्टीच्या ठिकाणी योग्य कर्मचारी नियुक्त करण्याच्या अटीचा समावेश आहे.

आर. राजा म्हणाले, "आम्ही महिलांनादेखील आवाहन करतो की, छेडछाड झाल्यास किंवा असुरक्षित वाटत असल्यास त्यांनी 112 क्रमांकावर कॉल करावा. हा कॉल जवळच्या पोलीस स्टेशनशी जोडला जाईल आणि तत्काळ कारवाई केली जाईल."

8 मार्च रोजी एरंडवण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे अमय तारे हे होळीच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. तारे यांनी सांगितलं की, त्यांनी या वर्षी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. ते म्हणाले, "सर्वांना सुरक्षित वातावरणात होळी खेळता यावी यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे 70 ते 80 बाउन्सर म्हणजे पैलवान तैनात केले जातील. कोणत्याही समस्यांचं निराकरण करण्यास मदत करण्यासाठी आणखी एक टीम नियुक्त केली आहे. या शिवाय, कार्यक्रमादरम्यान आमचा अँकर योग्यप्रकारे होळी खेळण्याबद्दल आणि इतरांना त्रास न देण्याबाबत वेळोवेळी सूचना देत राहील."

7 मार्च रोजी रावेत येथील मधुरा लॉन्स येथे रोहेन अँटोनी हे एका होळीच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. त्यांनी या वर्षी कार्यक्रमाच्या ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, " कार्यक्रमस्थळाच्या प्रत्येक विभागात महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी तीन ते चारजणी तैनात असतील. प्रवेशद्वारावर, या महिला बाउन्सर आमच्या महिला पाहुण्यांशी संवाद साधतील आणि त्यांना मदतीची आवश्यकता असल्यास मदतीसाठी तत्पर राहतील."

Holi 2023: होळीला जागरणाचे महत्त्व, होलिका दहनाच्या रात्री जप व ध्यानाची परंपरा

होळीच्या कार्यक्रमांमध्ये किंवा रस्त्यावरून जाताना अंडी, चिखल, वीर्यानं भरलेले फुगे किंवा अज्ञात द्रव फेकले जात असल्याच्या तक्रारी महिलांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत. अनेकींनी त्यांना अयोग्य स्पर्शाबाबतही तक्रारी केल्या आहेत. या अयोग्य वर्तनाकडे अनेकदा 'निरुपद्रवी मजे'च्या नावाखाली कानाडोळा केला जातो. 'बुरा ना मानो, होली है' यांसारखे वाक्प्रचार वापरून महिलांशी वाईट वर्तणूक केली जाते.

पूजा एस. यांनी आपला अनुभव सांगितला आहे. 2019 मध्ये, त्या नोकरीच्या रात्रीच्या शिफ्टनंतर घरी परतत होत्या. तेव्हा रस्त्यावर रंग, वॉटर गन आणि फुग्यांच्या सहाय्यानं होळी खेळत असलेल्या एका पुरुषांच्या गटानं पूजा यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना रंग लावला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पूजा यांना भीती वाटली होती.

ईशा एम. हिलादेखील काही वर्षांपूर्वी होळी पार्टीत असाच अनुभव आला होता. मद्यधुंद दिसणाऱ्या पुरुषांच्या एका गटानं ईशा आणि तिच्या मित्रांशी गैरवर्तन केलं होतं. या प्रकाराचा जाब विचारला असता पुरुषांच्या गटानं ईशाच्या गटाचा पाठलाग केला आणि वाद सुरू केला होता, असं तिनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी केलेली तयारी आणि हेल्पलाईन नक्कीच महिलांना सुरक्षित होळी साजरी करू देईल अशी आशा आहे.

First published:
top videos

    Tags: Holi 2023, Pune, Pune (City/Town/Village)