पुणे: पराभूत उमेदवाराकडून महिला सरपंच व कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण

पुणे: पराभूत उमेदवाराकडून महिला सरपंच व कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण

सरपंच पदावर निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित महिला सरपंच व कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण केली.

  • Share this:

पुणे, 27 फेब्रुवारी : गावपातळीवरील राजकारणात निवडणुकीनंतर अनेकदा टोकाचे वाद तयार होतात. याच वादातून हिंसेच्याही घटना घडतात. पुणे जिल्ह्यात खेडमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यात सरपंच पदावर निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित महिला सरपंच व कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत सदर महिला सरपंचाकडून आरोप करण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील मोहकल गावातील ही घटना असून निवडणुकीच्या पराभवावरुन झालेल्या वादातून पराभूत उमेदवाराने थेट सरपंचाच्या घरावर हल्लाबोल केला. त्याने घरात घुसून नवनिर्वाचित महिला सरपंच आणि कुटुंबीयांना मारहाण केली.

अश्विनी मारुती भागवत असं मारहाण झालेल्या सरपंचाचे नाव आहे. याबाबत राजगुरुनगर पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा - Pune Coronavirus: पुणेकरांवर पुन्हा एकदा निर्बंध? लवकरच होणार महत्त्वाचा निर्णय

'दोनच दिवसांपूर्वी माझी सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून त्यांनी माझ्या घरी येण्यास सुरुवात केली. ईश्वर महादेव रणपिसे याने घरात घुसून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसंच घरातील वस्तूंची तोडफोड केली. तेव्हा माझे पती घरी नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांनी घरी येत माझ्या पतीची कॉलर पकडत त्याला धमकावलं आणि मारहाण केली,' असा आरोप अश्विनी भागवत यांनी केला आहे.

दरम्यान, या सगळ्या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी आता पोलीस नक्की काय कारवाई करतात, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: February 27, 2021, 4:47 PM IST

ताज्या बातम्या