पुणे 5 फेब्रुवारी: पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune Collector) डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी एका आजीबाईला छोटीशी मदत करत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे. कथा एखाद्या चित्रपटासारखी किंवा पुस्तकासारखीच वाटावी अशी आहे. त्याचं झालं असं, की राजेश देशमुख हे एके दिवशी पुण्याच्या हवेली प्रांत कार्यालयात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना एक 83 वर्षांच्या आजीबाई भेटल्या. या आजीबाईंनी थेट कलेक्टरांनाच विचारलं, की साहेब काही अर्ज लिहून द्यायचाय का?. ते जिल्हाधिकारी आहेत याची कल्पनाही बहुधा त्यांना नव्हती.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सुकतेनं या आजीबाईंची चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं, की या आजीबाई गेली 38 वर्ष पुण्यातील हवेली प्रांत ऑफिसबाहेर अर्ज लिहिण्याचं काम करतात. विशेष बाब म्हणजे, ऑनलाईन जमान्यातही लोखंडे आजी खर्डेखाशी पद्धतीनं अर्ज लिहितात. मात्र, सगळंच ऑनलाईन झाल्यानं त्यांना खर्डेखाशीतून मिळणारं उत्पन्न अतिशय कमी झालं आहे.त्यांची ही व्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकली.
लोखंडे आजींची ही कथा ऐकून जिल्हाधिकारीही भावूक झाले आणि आजीबाईच्या मदतीला ते अगदी श्रावणबाळासारखे धावून गेले. त्यांनी लगेचच प्राताधिकाऱ्यांना सूचना दिल्या. डॉ. राजेश देशमुख यांनी आजीबाईंना श्रावणबाळ योजनेतून महिना हजार मानधन मिळेल, अशी सोय करून दिली. अपेक्षा नसताना मिळालेल्या या सुखद धक्क्यानं आजीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर, वेळेवर या आजीच्या मदतीला धावून जात डॉ. राजेश देशमुख यांनीही आपली तत्परता दाखवत माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. श्रावणबाळ योजनेचा लाभ आजीबाईंना मिळवून देत ते आजीबाईसाठी खऱ्या अर्थानं श्रावणबाळ ठरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.