ne पुणे, 17 ऑगस्ट : महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना (coronavirus) रुग्ण आढळले आहेत, अशा जिल्ह्यांच्या यादीत पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरात नेमक्या किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि पुण्यात कोरोनाचा कम्युनिटी प्रसार तर झालेला नाही हे तपासण्यासाठी पुण्यात सिरो सर्व्हे (sero survey) करण्यात आला आणि याचा अहवाल जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील सिरो सर्व्हे अहवालानुसार 36.1% ते 65.4% इतक्या लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या आहेत. याचा अर्थ या लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. पुण्यातील 5 प्रभागांमध्ये 20 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं.
1 जुलैपर्यंत पुणे महापालिकेच्या प्रशासकीय क्षेत्रात कोरोनाची पुष्टी झालेल्या पाच प्रभागांचा अभ्यास केला. एकूण 1,664 व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. या रक्तातील अँटिबॉडी तपासण्यात आल्या. त्यावेळी या प्रभागांमध्ये कोविड-19 संक्रमणाचा व्यापक प्रसार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अहवालानुसार, स्वतंत्र शौचालयं असणाऱ्या घरांमध्ये 45.3%, सामायिक शौचालयांचा वापर करणाऱ्यांमध्ये 62.2%, बंगल्यामध्ये राहणाऱ्यांमध्ये 43.9%, चाळी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये अनुक्रमे 56% आणि 62%, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांमध्ये 33% प्रमाण आढळून आलं आहे.
स्त्रिया आणि पुरुषांमध्ये फारसा फरक आढळला नाही. स्त्रियांमध्ये 50.1 तर पुरुषांमध्ये 52.8 इतकं प्रमाण आहे. तर 65 वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटातील व्यक्तींमध्येही अँटिबॉडीजचं असंच प्रमाण आहे. मात्र 65 पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये तुलनेने कमी म्हणजे 39.8% प्रसार आहे.
हे वाचा - पुणेकरांना मोठा दिलासा, अवघ्या 24 तासांत थेट मोबाईलवर पाहता येणार कोरोना रिपोर्ट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संशोधन संस्था (IISER), फरीदाबाबदमधील ट्रान्सलेशन स्वास्थ आणि तंत्रज्ञान संस्था (टीएचएसटीआय) आणि वेल्लोरमधील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय (सीएमसी) या संस्थेमधील शास्त्रज्ञांनी हे सर्वेक्षण केलं.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील तब्बल 636 गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळवलं आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या गावांना चांगलीच कसरत करावी लागली आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर आणि गावपातळीवर अनेक निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावांनी स्वयंस्फूतीर्ने गावात बंद पाळले. हे बंद पाळताना गावातील आरोग्य यंत्रणा सुरू राहील याची काळजीही घेण्यात आली.
हे वाचा - कोरोनाचा धोका कायम, पुण्यात गणेश विसर्जनाला परवानगी नाही - अजित पवार
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या गावांमध्ये दोन अनेकदा औषध फवारणी करण्यात आली. यासोबतच बाहेरून येणाऱ्यांसाठी विलगीकरण कक्षही स्थापन करण्यात आले. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक गावात दक्षता समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात विलगीकरण कक्षासोबतच बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले. जे नागरिक बाहेरून आले त्यांचे विलगीकरण करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune