पुणे, 28 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या 31 मार्चला येणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी पुण्यातली प्रसिध्द गणेश मंदिरे बंदच राहणार आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं दगडूशेठ हलवाई ट्रस्टचं मंदिर (Dagadusheth Halwai Ganapati ) आणि देव देवेश्वर संस्थांनचे सारसबाग गणेश मंदिर बुधवारी 31 मार्च ला संकष्टी चतुर्थी दिवशी बंदच राहील.
दगडूशेठ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहील, केवळ ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. गणेश भक्तांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केलं आहे. यापूर्वी मार्चमध्येच अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं .संकष्टी चतुर्थीला शहर आणि परिसरातून हजारो नागरिक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. कोरोना प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद राहणार आहे.
हेही वाचा - पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत असतानाच अदार पूनावाला यांनी दिली GOOD NEWS
देव देवेश्वर संस्थानची सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिर,पौड फाटा येथील दशभुजा मंदि र,लक्ष्मी नगरमधील रमणा मंदिर ही सर्व मंदिरे बुधवारी चतुर्थी दिवशी बंद राहतील अशी माहिती संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी दिली.
शिवजयंतीही साधेपणानेच साजरी होणार
वाढत्या कोरोनाचा फटका तिथीनुसार येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमांनाही बसला आहे. किल्ले शिवनेरी इथं बुधवारी शासकीय नियमांचे पालन करून साधेपणाने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिव तृतीयेला सकाळी 7 वाजता शिवजन्म ,पाळणा आणि धार्मिक कार्यक्रम होतील . यंदा 42 वे वर्ष आहे असं सोहळा प्रमुख शाहीर हेमंत मावळे म्हणाले.
पुण्यात लॉकडाऊन लागणार?
पुण्यात जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर शुक्रवारी 2 एप्रिलला लॉकडाऊन लावायचा का नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे होळी ,धुळवड ,रंग पंचमी ,शिवजयंती सगळेच सण साधेपणाने साजरे होत आहेत. लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळलेच पाहिजेत. रविचारपासून रात्री 8 ते सकाळी 7 नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. यामुळे हॉटेल ,चित्रपट गृह,नाट्य गृह येथील गर्दी कमी होईल. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आले तर कारवाई केली जाणार आहे.
राजकीय ,सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाले आहेत. लग्न समारंभाला 50 तर अंत्यविधीला 20 एवढ्याच जणांना परवानगी असेल. एकूणच हा आठवडा पुण्यासाठी महत्वाचा आहे. कारण कोरोना बाधितांची संख्या कमी झाली तरच लॉकडाऊनची टांगती तलवार म्यान होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.