अंनिस शेख(प्रतिनिधी),
पुणे, 7 जून: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात पर्यटकांना पर्यटनासाठी जाण्यास यंदा अनिश्चित काळापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅमचाही समावेश आहे. यंदाच्या पावसाळ्यात भुशी डॅम पर्यटनासाठी बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बंदीबाबत आदेश काढला आहे.
हेही वाचा... लॉकडाऊनमध्ये फिरण्यासाठी वडिलांनी दिली नाही बाईक, मुलानं उचललं टोकाचं पाऊल
पुणे जिल्ह्यातील भुशी डॅम, खडकवासला धरण, भाटघर धरण, नीरा-देवघर धरण आणि पानशेत धरण या धरणांवर पर्यटनासाठी व वर्षा विहारासाठी जाण्यास शासनाने बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवलकिशोर राम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पावसाळ्यात भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, हवेली, जुन्नर व आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या परिसरातील धरणे, गड-किल्ले, घाट, मंदीरे आणि पर्यटनस्थळांवर दर शनिवारी व रविवारी पर्यटकांची गर्दी असते. यामध्ये मावळ तालुक्यातील भुशी डॅम व लोणावळा परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाट परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गड-किल्ले परिसर आणि वेल्हे तालुक्यातील पानशेत धरण आदींचा समावेश आहे.
हेही वाचा...काय सांगताsss दारू स्वस्त होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
धरणातील पाण्यात बुडण्याच्या आणि वाहून जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तसेच नागरिकांच्या गर्दीमुळे आणि तरुणांच्या व मद्यपींच्या हुल्लडबाजीमुळे मारहाणीच्या व भांडणांच्या घटनाही घडलेल्या आहेत. यामुळे नागरिकांची सुरक्षीतता धोक्यात येत असते. यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील भुशी डॅम व इतर सर्व धरणांवर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.