पुणे, 27 जानेवारी : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या असेही प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात मित्राच्या पत्नीला तोंडावर ऍसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची आणि मुलाला किडनॅप करण्याची धमकी देण्यात आली आणि यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबल उडाली आहे.
इतकेच नव्हे तर बलात्कार केल्यानंतर पैशाची मागणी करून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठीही तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. याप्रकरणी एका 39 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार भाऊ आणि बहिणीविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
आरोपी साजिद हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. 2021 पासून वारंवार हा धक्कादायक प्रकार घडत होता. यानंतर 39 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन साजिद मोहम्मद अली कुंजू (वय 39) आणि हसीना या दोन्ही बहीण भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर चंदननगर पोलिसांनी साजिद याला अटक केली आहे.
महिलेला दिली भयानक धमकी -
आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र होता. त्यामुळे दोघांची ओळख होती. याचाच फायदा उचलत आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन केला आणि तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत मैत्री कर, शारीरिक संबंध ठेव, जर नकार दिला तर मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवीन, अशी धमकी पीडितेला दिली होती. इतकेच नव्हे तर फिर्यादी महिलेला ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.
हेही वाचा - पिंपरी चिंचवड : 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापाचंही टोकाचं पाऊल
तसेच तुझ्या तोंडावर ऍसिड टाकेल आणि तुझा चेहरा विद्रूप करेल. मुलाला किडनॅप करेल, अशी धमकी देत आरोपीने या महिलेला जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले.
या धक्कादायक प्रकारानंतर आरोपीने पुन्हा फिर्यादीला वारंवार फोन केला आणि पैशाची मागणी केली. तर आरोपीची बहीण असलेल्या दुसऱ्या आरोपीने भावासोबत लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी धमकी दिली, अशी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चंदननगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. याघटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune crime news, Sexual assault, Sexual harassment