पुणे, 16 मार्च : राज्यात कोरोनाची लाट ओसली आहे. मात्र आता त्यानंतर H3N2 व्हायरसने डोकं वर काढलं आहे. पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये H3N2 बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील H3N2 बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पहिला बळी
पिंपरी चिंचवडमध्ये एच 3 एन 2 विषाणूची लागन झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा 73 वर्षीय वृद्ध अनेक आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील आणखी चार व्यक्तिंना एच 3 एन 2 ची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
अहमदनगरमध्ये एकाचा मृत्यू
देशात नव्याने आढळलेल्या H3N2 व्हायरससह कोरोनाची लागण झालेल्या अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोबतच तपासणीमध्ये त्याला H3N2 व्हायरसची देखील लागन झाल्याचं समोर आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, H3N2 Virus, Pune, Pune news