पुणे, 15 फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या पुणे पुरातत्त्व विभागाने राजगड किल्ल्यासंदर्भात एक आदेश काढल्यानंतर गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पुरातत्त्व विभागाकडून राजगड मुक्कामासाठी बंद, असा आदेश काढण्यात आला आहे. राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर सह्याद्री ट्रेकर्सने निषेध व्यक्त केला आहे.
सह्याद्री ट्रेकर्सने काय म्हटले -
तुमचे शासकीय नियम आहेत म्हणून हा आदेश काढला पण असेल तुम्ही, पण असे किती शासकीय नियम तुम्ही किल्ल्यांच्या बाबतीत पळता. काल परवाच राजगड केलेल्या चुकीच्या कामामुळे खूप मोठं रामायण झालं आहे. त्याचा तर बदला नाही ना घेत तुम्ही. अशी बरीच कामे अगोदरच तुम्हीच गडावर केली आहेत. आता तुम्ही कसल्या काळजी पोटी गड मुक्कामास बंद करणार आहात?, असा सवालही त्यांनी केला आहे.
राजगड अभ्यासपूर्वक पाहणाऱ्या कोणत्याही गडप्रेमीस विचारा गड एका दिवसात पाहून होतो का? गडावर जाऊन मुक्काम करून कमीत कमी दोन तीन दिवस गड पहिला तर गडा पाहून होतो. आता ज्यांना गड अभ्यासायचा आहे त्यांना रोज गडावरून खाली जाऊन वरती यावं लागणार आहे. एका दिवसात गड पाहिला तर भोंज्या शिवल्यासारखा होतो.
कित्येक गडप्रेमी गडावर मुक्काम करून नवरात्र, महाशिवरात्री साजरा करतात. तर कोणी शिवजयंती, दसरा, दिवाळी गडावर मुक्काम करून गड सजवून साजरा करतात. मात्र, आता हे सर्वच बंद होणार आहे.
गडावर मुक्काम केलेल्या लोकांनी आजपर्यंत गडावर काय नुकसान केलं आहे? हे कोणीही सांगावे किंवा कोणत्या वास्तुस हानी पोहचवली आहे ते सांगावे, असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा - Pune Accident News : पुण्यात 5 महिलांना कारने चिरडणाऱ्या भीषण अपघाताचा VIDEO आला समोर
तसेच ज्या खात्याला गडाची एवढी काळजी आहे त्यांनी आपली मागील कामे कशी केली आहेत, याची एकदा शहानिशा करावी. आपल्या मागील कित्येक चुका अगोदर या खात्याने पहाव्यात. नको ती हिटलरशाही लादू नका. गड मुक्कामास बंद करून, अशी कोणती कामे यांना गडावर करायची आहेत, याचे उत्तर कोण देऊ शकेल का?, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. हुकूमशाही बंद करा, राजगड वाचवा, अशी घोषणाही सह्याद्री ट्रेकर्सने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.