सुप्रिया सुळे यांचा संभाजी भिडेंच्या 'सांगली बंद'वर थेट आरोप, म्हणाल्या..

सुप्रिया सुळे यांचा संभाजी भिडेंच्या 'सांगली बंद'वर थेट आरोप, म्हणाल्या..

हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्यांच्यासाठी 'बंद'. हे जरा चुकीचे वाटतं.

  • Share this:

पुणे,17 जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पुकारलेल्या सांगली बंदवर खोचक टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्यांच्यासाठी 'बंद'. हे जरा चुकीचे वाटतं... यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर असं करणं हे योग्य वाटत नाही. संजय राऊत यांनी कालच त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात आहेत. पुणे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या बाईक रॅलीला सुप्रिया सुळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. कलेक्टर ऑफिस ते लष्कर पोलीस स्टेशनपर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली. रस्ते अपघात आणि हेल्मेटच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली आहे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, एसपी, आरटीओ असे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पुणेकरांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यासाठीच या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया म्हणाल्या, आमचं दडपशाहीच सरकार नाही. हाच फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मनमोकळ्या मनाने टीका करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमच काम करत राहू त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी.

'आरे' वर सुप्रिया सुळेंचे 'कारे'

आरे कारशेडबाबत दुर्दैव हे की आधी आम्ही झाडे तोडू नका यासाठी आम्ही विरोध केला. ती झाडे आधीच्या सरकारने तोडली, पर्यावरणाचा कुठलाही विचार न करता अतिशय असंवेदनशील पणे सरकारने निर्णय घेतले. त्यामुळे आरे आणि इतर विकास कामे पर्यावरणाचा विचार करूनच आमचं सरकार करेल. माहुलवासीय आंदोलनाला पाठिंबा असून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून माहिती घेऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रांजळप्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊतांची हकालपट्टी करा...

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूरला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. या विरोधात सर्व सांगली जिल्हा 17 जानेवारीला बंद राहणार आहे. संजय राऊतांनी माफी न मागितल्यास सर्व महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी तातडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. भिडे गुरुजी यांच्या या आवाहनानंतर हे आंदोलन आणखी चिघळणार अशी शक्यता आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. शिवसेनेला सत्तेचा अहंकार झाला असून त्या अहंकारातूनच हे वक्तव्य करण्यात आलंय. त्यांनी तातडीने यासाठी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

First published: January 17, 2020, 12:00 PM IST

ताज्या बातम्या