ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 29 जुलै : कोल्हापूरचा दुधगंगा कालवा भ्रष्टाचाराने पोखरला असून 40 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंत्यास तात्काळ निलंबित करण्यात आले असून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकार? कसा झाला भ्रष्टाचार? काळमवाडी धरणातून आलेला डावा कालवा अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराने पोखरला आहे. ठेकदारावर अधिकारी मेहराबन झाले असून 40 कोटींची बिले संगनमताने दिली आहेत. राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर यांनी पुराव्यासह हा भ्रष्टाचार थेट विधानसभेत उघड केल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी कार्यकारी अभियंता विनया बदामे यांना जबाबदार धरून त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निलंबन केले आहे. काळमवाडी धरणातून आलेला डावा कालवा सुमारे 76 किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्या अस्तिरीकरणाच्या कामात हा भ्रष्टाचार झाला आहे. आमदार प्रकाश अबीटकर यांनी याबाबतची लक्षवेधी अधिवेशनात मांडून सरकारचे याकडे लक्ष वेधले. आर्थिक स्वार्थासाठी अधिकाऱ्यांनी मनमानी काम केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला तर 20 वर्षे झाली एकाच ठेकेदाराला काम देऊन अधिकारी त्याच्यावर मेहरबान होत असल्याचे त्यांनी उघडकीला आणले. 2019-20 मध्ये या कामाची दक्षता समितीने चौकशी करून त्यावर तशोरे ओढले होते. शिवाय 3 कोटी 48 लाखाचे दायित्व अधिकाऱ्यांवर सिद्ध झाले होते. मात्र, असं असतानाही अधिकाऱ्यांनी सुधारित तांत्रिक मान्यता न घेता पुन्हा 40 कोटी ठेकेदाराला दिल्याचा आरोप त्यांनी केला. चुकीचे काम करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. वाचा - दर आठवड्याला एक माणूस फोडा, त्यामुळेच तर…; ठाकरेंचा पुन्हा शिंदेंवर हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अबीटकर यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता विनया बदामे यांना निलंबित केले तर या प्रकरणी चौकशी समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले. कोल्हापुरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सिंचन प्रकल्पाला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. अधिकाऱ्यांनी मनमानी करत पाण्यासारखा पैसा कमावला आहे. मात्र, कालव्याचे काम नित्कृष्ट केले आहे. त्यामुळे कालव्याला सुद्धा धोका उदभवणार आहे. त्यामुळे फक्त निलंबन करून न थांबता दोषींवर कडक कारवाईची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.