बारामती, 30 जून: मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण (Mumbai Fake Vaccination) प्रकऱणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. ही अटक पुणे जिल्ह्यातील बारामती (Accused arrest from Baramati) येथून करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश पांडे असे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी राजेश याने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती.
आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉज वरून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
30 मे 2021 रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली 12,40,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. तसेच एक कारही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी यांची बँक खाते गोठवण्यात आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baramati, Coronavirus, Mumbai, Pune