पुणे, 11 मार्च: मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam 2020) पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने याबाबत घोषणा केली आहे. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यामध्ये तर विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने शास्त्रीरोडवर रास्तारोको करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले आहेत. यावेळी MPSC अभ्यासिकेतील 2 हजार मुलं रास्तारोकोत सहभागी झाल्याचा अंदाज आहे. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आयोगाचा निषेध व्यक्त केला आहे.
आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं (Coronavirus Pandemic) कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
MPSC Exam 2020: पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, परीक्षा लांबणीवर गेल्याने रास्तारोको (1/2) pic.twitter.com/7nKPPukz5B
— News18Lokmat (@News18lokmat) March 11, 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी गुरुवार याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2020 पुढे ढकलण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च 2021 रोजी संदर्भातील निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. या पत्रात असे म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
पुण्यासह अमरावती, सातारा याठिकाणी देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलून राज्य सरकारने आम्हाला नैराश्यात टाकलं असल्याची प्रतिक्रिया साताऱ्यातील विद्यार्थ्यांनी दिली आहे. अजुन किती दिवस आम्ही अभ्यास करत राहायचं असा सवाल या विद्यार्थ्यांनी सरकारला केला आहे.
विद्यार्थ्यांना भेडसावणारा आणखी एक प्रश्न म्हणजे अनेक विद्यार्थी शहरात बाहेर राहून अभ्यास करत आहेत. तर अशावेळी खर्च कसा भागवायचा असा सवाल या विद्यार्थ्यांसमोर आहे. शिवाय वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं काय? असा सवाल देखील हे विद्यार्थी विचारत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune