पुणे, 18 जुलै : फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील प्रमुख ऐतिहासिक शहरांमध्ये पुण्याचा समावेश होता. पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात महात्मा फुले मंडई ही इमारत आहे. या भाजी मंडईला पुण्याची अन्नपूर्णा असंही म्हंटलं जातं. पुण्याच्या दीडशे वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेल्या या इमारतीचा इतिहास आपण पाहणार आहोत. पुणेकरांचा होता विरोध महात्मा फुले मंडई इमारतीचे 5 ऑक्टोबर 1885 रोजी उद्घाटन झाले. मंडई सध्याच्या जागी येण्यापूर्वी शनिवारवाड्याच्या समोरील मोकळ्या पटांगणात भाजी मंडई भरत असे. 1828 साली शनिवारवाडा जळून खाक झाला. त्यानंतर या पंटागणात कुणीही कसंही वावर असतं. ब्रिटीशांनी 1840 च्या सुमारास तिथं फळं आणि भाज्यांचा बाजार भरवण्यास परवानगी दिली.
चिंच, धान्य, मसाले, मिरच्या-कोथिंबीर, बटाटे, भाज्या, सरपण, गुरांचा बाजार अशा वेगवेगळ्या वस्तूंसाठी इथं वेगवेगळ्या जागा होत्या. हा बाजार उघड्यावर भरायचा, दुकानांना आडोसा नव्हता. त्यामुळे एक स्वतंत्र, मध्यवर्ती जागेत मंडईची इमारत असावी आणि त्यात सर्व व्यापाऱ्यांना गाळे असावेत, अशी कल्पना पुढे आली. त्यानुसार सरदार खासगीवाल्यांच्या चकलीबागेतील जागा विकत घेऊन ब्रिटिशांनी मंडईचे बांधकाम सुरू केले. त्यावेळी पुणेकर नागरिकांनी मंडईच्या बांधकामाला कडाडून विरोध केला होता. पुणे नगरपालिकेने दोन लाख तीस हजार रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीचं उद्घाटन लॉर्ड रे आणि ड्युक ऑफ कनॉट यांनी उद्घाटन झाले. तेव्हाचे ‘रे मार्केट’ असलेल्या 1400 गाळ्यांच्या या नव्या मंडईत जुन्या मंडईतील व्यापारी यायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना इथं सक्तीनं हलवावे लागले. 1888 साली येथील गाळ्यांचा लिलाव करण्यात आला. 22 जुलै १९२४ ला मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते मंडईच्या समोरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 1938 मध्ये ‘रे मार्केट’ असे नाव बदलून ‘महात्मा फुले मार्केट’ असे नामकरण करण्यात आले. ‘ पुणे तिथे…’ किचन क्विनचा संपला काळ, आता व्हा किचन सम्राट, पुरुषांसाठी खास किचन क्लास! भव्य कमानी आणि मोठ्या खिडक्यांमुळे इथे हवा आणि प्रकाश खेळती राहते. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील प्रदेशासाठी अशी खुली रचना उपयुक्त आहे. त्यामुळे भाजीपाला लवकर खराब होत नाही. सध्या महात्मा फुले मंडई हा पुण्याचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग आहे. दरम्यानच्या काळात मंडईत अनेक सुधारणा करण्यात आल्या. 1979 साली इथला घाऊक विभाग गुलटेकडी मार्केट यार्ड इथे हलवण्यात आला. मंडईचे वैशिष्ट्य असे की इथे मुख्य इमारतीच्या भोवती माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सामान मिळते. वेगवेगळ्या जातीधर्माचे नागरिक इथे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने व्यवसाय करतात. इथल्या विक्रेत्यांना एकत्र बांधून ठेवणारा मंडईचा शारदा गणपती हे इथले आणखी एक आकर्षण आहे. या परिसराने अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते पुण्याला दिले. त्यामुळे या मंडईचे वर्णन ‘मंडई विद्यापीठ’ असेही करतात. त्याचबरोबर मुळशी पॅटर्न या गाजलेल्या मराठी सिनेमाचं शूटिंगही इथं झालं आहे.