पुणे, 28 मे: राज्यातल्या लॉकडाऊनचं (Lockdown in State) नेमकं काय होणार याच्या चर्चांना आता वेग आलेला आहे. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी याबाबत काही संकेत दिले आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर (Corona Situation) नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेलं लॉकडाऊन पूर्णपणे उठवायचा प्रश्नच नसल्याचं सांगत राजेश टोपे यांनी याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय असेल याचे संकेत दिले. (वाचा- पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित; आगाऊ पैसे आकरल्यास होणार कडक कारवाई ) राज्यात 1 जूनपासून कोरोनाच्या लॉकडाऊनबाबत नेमका काय निर्णय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. आता सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये गो स्लो अशा पद्धतीनंच जावं लागणार आहे. त्यामुळं 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये जवळपास पक्का झालेला आहे. पण त्यासाठीचं अंतिम नियोजन होत आहे. ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव अत्यंत कमी झाला आहे, तिथं नेमका कसा निर्णय घ्यायचा. दुकानांच्या उघडण्याच्या वेळा वाढवायच्या का. इथर काही शिथिलता द्यायची का याचा निर्णय होत आहे. पण गर्दी होण्याच्या ठिकाणी कोणतीही शिथिलता मिळणार नाही. (वाचा- भय इथले संपत नाही! फक्त कोरोनाच नव्हे तर आणखी 5 आजारांचं थैमान, परिस्थिती गंभीर ) सार्वजनिक कार्यक्रम, लग्न, राजकीय, धार्मिक कार्यक्रम याला तर 15 दिवस कुठलीही शिथिलता मिळणार नाही. मात्र ज्या जिल्ह्यांत कोरोनावर चांगलं नियंत्रण आहे, त्याठिकाणी निश्चितच शिथिलता मिळू शकते असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र पूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना संदर्भातील टास्क फोर्स, तज्ज्ञ आणि सर्व मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील असं टोपे यांनी म्हटलं आहे. 31 तारखेपर्यंत अंदाजे याबाबत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र सगळीकडं पूर्वीसारखं सुरू होणार नाही. तर हळू हळू जिथं परिस्थिती आवाक्यात आहे, तिथंच शिथिलता होईल असे संकेत राजेश टोपेंनी दिले आहेत. त्यामुळं पुढचे आणखी किमान 15 दिवस लॉकडाऊन किंवा निर्बंधांचा सामना करावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







