पुणे, 04 जुलै: अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) वाल्हेकरवाडी येथील मठाधिपती महाराजानं (Maharaj) आकुर्डीतील (Akurdi) एका व्यावसायिकाची हत्या (Businessman Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर आरोपीनं आपल्या अनुयायांच्या मदतीनं व्यावसायिकाचा मृतदेह (Murder) कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव रचला आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मठाधिपती महाराजासह चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आनंद गुजर असं हत्या झालेल्या 44 वर्षीय व्यावसायिकाचं नाव आहे. तर मठाधिपती रमेश विलास कुंभार (वय-49, वाल्हेकरवाडी), सरोज आनंद गुजर (वय-40, चिखली), यश योगेश निकम (वय-19, वाल्हेकरवाडी) आणि अमोल रामदास बडदम (वाल्हेकरवाडी) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मठाधिपती रमेश कुंभार आणि त्याच्या काही साथीदारांनी अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या वादातून आनंद गुजर यांची हत्या केल्याची तक्रार मृताचा भाऊ सुनिल गुजर यांनी केली आहे. शनिवारी सकाळी कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. घटनास्थळी एका दुचाकी देखील आढळून आली आहे. पण या दुचाकीचा नंबर बनावट असल्याचं निष्पन्न झालं पण पोलिसांनी चॅसी नंबरद्वारे गाडीचा तपास केला असता, संबंधित दुचाकी मृत आनंद गुजर यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. हेही वाचा- कुटुंबाने लेकीला झाडाला लटकवून जनावरासारखं मारलं; घटनेचा धक्कादायक VIDEO पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आनंद गुजर यांची पत्नी मागील सहा महिन्यांपासून महाराजांच्या मठात राहत होती. यातून महाराज आणि मृताच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. मृताच्या पत्नीनं आरोपी महाराजाला एक ब्रीझा चारचाकी भेट देखील दिली होती. याच कारणातून शुक्रवारी सकाळी आनंद गुजर मठामध्ये गेला होता. याठिकाणे त्याचे महाराजांबरोबर जोरदार भांडण झालं. या भांडणात महाराज, मृताची पत्नी आणि अनुयायांनी गुजर यांना लाकडी बांबू आणि बॅटनं बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा- पत्नीपासून दूर जाण्यासाठी नवीन लग्न झालेल्या तरुणाने घेतली ‘कोरोना’ची मदत यानंतर आरोपी महाराजांनी आपल्या अनुयायांच्या मदतीनं आनंद गुजर यांचा मृतदेह कात्रज घाटात आणून फेकला आणि अपघाताचा बनाव रचला. मृताचा भाऊ सुनिल गुजर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.