लॉकडाऊनमध्ये पुण्यात तान्ह्या बाळाचा जीवनसंघर्ष, अशी जगतंय फाटलेल्या आभाळाखाली!

लॉकडाऊनमध्ये पुण्यात तान्ह्या बाळाचा जीवनसंघर्ष, अशी जगतंय फाटलेल्या आभाळाखाली!

पुण्यातील अवघ्या 3 महिन्यांची तान्हुली आणि तिच्या आजीची हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी आहे.

  • Share this:

पुणे, 13 जून: कोरोनामुळे देशात लागलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या जगण्याचा आधार हिरावून घेतला आहे. सिमेंटच्या पक्क्या घरांच्या भिंतीही या कोरोनामुळे हादरल्या आहेत तर हातावर पोट भरणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्यांची तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अशीच जगण्याचा आधार असलेली झोपडी, कोरोना आणि लॉकडाऊननं हिरावल्यानंतर नुकत्याच जन्मलेल्या प्रतिक्षाला फाटलेल्या आभाळाखाली काढावं लागत आहेत. पुण्यातील अवघ्या 3 महिन्यांची तान्हुली आणि तिच्या आजीची हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी आहे.

हेही वाचा..डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाला वादळाचा तडाखा, गावकऱ्यांना असं मिळालं जीवदान

पाचवीला पुजलेला संघर्षानं कल्पना शिंदे यांची आजची पाठ सोडलेली नाही. आयुष्यात अनेक संकटं आली तर कल्पना शिंदे यांनी जिद्द सोडली नाही तर संघर्षासमोर गुडघेही टेकले नाहीत. पण नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या नातीच्या डोक्यावर छप्पर नाही, हे पाहून मात्र आजीनं हाय खाल्ली आहे.

मूळच्या बारामतीच्या असलेल्या कल्पना शिंदे या पोट भरण्यासाठी पुण्यात आल्या. त्या स्वारगेट भागात राहात होत्या. त्यांची मुलगी अंजली अभिषेक वाघमारे हिची डिलिव्हरी 17 मार्च 2020 ला ससून रुग्णालयात झाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कल्पना शिंदे आपली मुलगी आणि नातीला घरी घेऊन आल्या. मात्र, त्याचदिवशी घरमालकानं त्यांना घर खाली करण्यास सांगितलं. आता करावं काय? असा गंभीर प्रश्न कल्पनाबाईंसमोर उभा राहीला. लॉकडाऊनच्या काळात त्यांची राहण्याची कुठेच सोय झाली नाही.

कल्पनाबाईंसह तिचे पती व मुलगा तिघे बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे कामे बंद झाल्यामुळे उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात नुकतीच डिलिव्हरी झालेली मुलगी व तिचं तान्ह बाळाची जबाबदारी. अशा परिस्थितीत ओली बाळंतीण व छोट्या बाळाला घेऊन रेसकोर्सजवळच्या झाडाखाली कल्पनाबाईंनी आसरा घेतला.

रेसकोर्स येथील फुटपाथवर झाडाखाली गेली तीन महिने हे कुटुंब छोट्या बाळासह राहात आहे. कोणीतरी जेवण देतं. कधी मिळतं तर कधी मिळत नाही. मिळेल ते खाऊन हे कुटुंब गेल्या तीन महिन्यापासून उघड्यावर जगत आहे.

एम्प्रेस गार्डनच्या जवळ असलेल्या डबक्यातील पाण्याने सर्वजण अंघोळ करतात. छोट्या बाळाला ही गार पाण्याने अंघोळ घालतात. कोणी पैसे दिले तर दूध किंवा दूधाची पावडर आणून छोट्याशा जीवाचे पोट भरतात.

हेही वाचा..कोरोना पॉझिटिव्ह असूनही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी परतली घरी

सतत येणार्‍या वाहनांच्या आवाजामुळे तान्हुलीची झोप पण होत नाही. कर्कश हॉर्नमुळे बाळ दचकून उठते. यांची करूण अवस्था पाहून अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या नंदिनी जाधव या गेले तीन दिवस त्या बाळाच्या दूधासह पूर्ण कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. पण, आज खरी गरज आहे ती या तान्ह्या बाळाच्या डोक्यावर छप्पर धरण्याची...

First published: June 13, 2020, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading