पुणे, 28 मे : महाविकास आघाडी सरकार (MVA Government) पाडण्याच्या मुद्यावरून भाजप आणि सत्तेतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप (Blame Game) सुरू आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) दोन पाटील या मुद्द्यावर आमनेसामने आलेत. महाविकास आघाडी सरकार त्यांच्यामधील कुरबुरींमुळं सगळे झोपेत असतानाच कधी कोसळेल, हे सांगताही येणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) केलं. त्याला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
(वाचा-बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस-गारपीट, घरांची छपरं उडाली, अनेकांचे मोठे नुकसान)
जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना म्हटलं की, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे. चंद्रकांत पाटील यांना स्वप्न बघण्याचा छंद आहे, त्यांनी तो छंद खुशाल जोपासावा, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. चंद्रकांत पाटलांची विधीमंडळ अधिवेशन बोलावण्याची मागणीही जयंत पाटलांनी धुडकावली. कोरोना महामारीमुळे अधिवेशन घेणं शक्य नाही. एवढीच हौस असेल तर मग पंतप्रधानांनाही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत आहे का? याची चर्चा होऊ शकते, असंही जयंत पाटलांनी म्हटलं.
(वाचा - प्रियकराच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास विवाहितेनं दिला नकार; दगडाने ठेचून हत्या)
मराठा आरक्षण वादाशी आता केंद्र सरकारचा संबंध नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यावर राज्यातील मराठा समाजाची ते दिशाभूल करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणतात ते नेहमीच खरं असतं असं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील आहे, तो सुटायला हवा, असा सगळ्यांचाच आग्रह आहे. संभाजी राजे त्यात पुढाकार घेताहेत, ही चांगली बाब आहे. अशी पुष्टीही जयंत पाटलांनी यावेळी जोडली.
उजनीच्या पाण्यावरून झालेल्या मुद्द्यावरही पाटील बोलले. इंदापुरच्या प्रश्न वेगळा आहे, तिथंही पाण्याची गरज आहे. त्याबाबत स्वतंत्र विचार करतोय. सोलापूरकरांचा उजनी धरणाच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे तो कोणीही हिरावून घेणार नाही. सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचं पाणी कुठेही जाऊ देणार नाही. सोलापूरकरांचा गैरसमज झाला होता पण आता 5 टिएमसी पाणी सर्वेक्षणाचा आदेशच रद्द झाल्याने तो वादही मिटलाय असंही जयंत पाटील म्हणाले.
पदोन्नती आरक्षणासंदर्भात काँग्रेसचे वडेट्टीवार आणि अजित पवार यांच्यात कोणतेही वाद नाहीत. कोर्ट, कचेरी, कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झालेत आणि त्यातुन मार्ग कसा काढायचा हा प्रयत्न सुरु आहे. अजित दादा या संदर्भात विरोधी आहेत, असं चित्र रंगवण्याचं काम काही लोक करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत कायद्याचा अभ्यास करुन ज्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांनी जे निर्णय दिले आहेत त्याच्या अधीन राहून काम करावे लागेल, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.