पुणे, 3 एप्रिल : पुण्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक (Restrictions in Pune) करण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University Exams) परीक्षाही ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. असं असलं तरीही त्याबाबतची सराव परीक्षा मात्र 5 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा सराव करत त्याचे तंत्र समजावून घेता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल याची तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 5 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात ही सराव परीक्षा होणार आहे. हेही वाचा - पुणे जिल्ह्यात कोरोनाचा हाहा:कार; 24 तासांत उच्चांकी रुग्णवाढ दरम्यान, विद्यापीठाच्या पहिल्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्याटप्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे. ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात येईल. sppuexam.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सूचना, युजर मॅन्युअल आणि व्हिडीओच्या माध्यमातून परिक्षेविषयी माहिती दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास हेल्पलाईन 020- 71530202 क्रमांकदेखील देण्यात आला आहे. अवघ्या 48 तासांत कळणार स्कोअर विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिल्यानंतर युजर प्रोफाइलमध्येच त्यांना 48 तासांत ऑनलाईन स्कोअर कळणार आहे. ज्याचे नंतर गुणांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास त्यांना 48 तासांच्या आत नोंदवावी लागणार आहे, असंही परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.