पुणे, 2 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधताना लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात पुन्हा एका दिवसभरात उच्चांकी 9086 कोरोना रूग्णवाढ झाली आहे. त्याशिवाय मृतांची संख्या 58 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 4653, पिंपरी-चिंचवडमध्ये 2463 तर ग्रामीण भागात 1383 रूग्णवाढ झाली आहे. एकट्या पुणे शहरात 37 हजार 126 सक्रिय रूग्ण आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या तब्बल साडे पाच लाखांवर पोहोचली आहे. दुसरीकडे राज्यातील नव्या कोरोना रुग्णांनी आज 45 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात तब्बल 47827 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हे ही वाचा-
पुण्यात कडक निर्बंध लावणे हा काळा दिवस’; त्रस्त रेस्टॉरंट व्यावसायिकांचा विरोध
आज मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, हंगेरी, डेन्मार्क, बेलजियम, आर्यलंड या विविध देशांमधील कोरोना स्थिती, दुसऱ्यांदा करावे लागलेले लॉकडाऊन आणि उपाययोजनांची माहिती राज्यातील जनतेला दिली. लॉकडाऊन घातकच आहे. अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक असले तरी त्यामुळे अर्थचक्र बिघडते, ही कात्रीतली स्थिती आहे. त्यामुळे मी कोरोनाला हरवणार, हे प्रत्येकाने ठरवायला हवे. स्वंयशिस्तीने वागायला हवे, गर्दी टाळायला हवी, अनावश्यकरित्या फिरणे बंद करायला हवे, असे आवाहन ही त्यांनी केले. मागच्यावर्षी आपण एकजुटीने लढत कोरोना नियंत्रणात आणला होता, त्याच पद्धतीने हातात हात घालून सर्व मिळून कोरानाशी लढू या आणि जिंकू या असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







