• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात कोरोनाच्या भीतीपोटी शेकडो अस्थिकलश स्मशानभूमीतच धुळखात पडून...!

पुण्यात कोरोनाच्या भीतीपोटी शेकडो अस्थिकलश स्मशानभूमीतच धुळखात पडून...!

समाजाची घट्ट म्हणवणारी विण नेमकी कुठवर विस्कटलीय...?

  • Share this:
पुणे, 3 जून : मरणाने केली सुटका...जगण्याने छळले होते! असं आपण एखाद्या मृतदेहाच्या अवहेलनेबाबत नेहमीच म्हणतो. पण कोरोनाच्या या महामारीने मानव जातीला आता त्याच्याही पुढचं विदारक आणि मन विष्णन्न करणारं दाहक चित्र दाखवलंय. ठिकाण अर्थातच स्मशानभूमीतलं आहे. कोरोनाच्या या महामारीत कित्येकांच्या नशीबी फक्त बेवारसपणे चितेवर जाणंच थांंबलं नाही तर अंत्यविधीनंतर त्यांचे अस्थीकलश घ्यायला सुद्धा काही जणांचे नातेवाईक फिरकलेले नाहीत. यावरून समाजाची घट्ट म्हणवणारी विण नेमकी कुठवर विस्कटलीय...? त्याचीच परिचिती देणारं भयावह वास्तव पुण्यातल्या कैलास स्मशानभूमीत बघायला मिळालं. त्याचं झालं असं की, कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर स्मशानभूमीतले कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांना त्यांच्या आप्तेष्ठांच्या अस्थी घेऊन जाण्यासाठी फोन करू लागलेत. पण स्मशानभूमीत पडून असलेल्या या कोरोना मृतांच्या अस्थीच घ्यायला त्यांचे नातेवाईक फिरकत नाहीत. कोरोना काळात तर या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव तब्बल 300 अस्थी कलशांचं संगम घाटावर सामूहिकपणे विधीवत विसर्जन करावं लागलं आणि आताही किमान 100 अस्थीकलश त्यांच्या आप्तेष्टांची वाट बघताहेत. आपलं म्हणवणारं कोणीतरी येईल आपल्याला एकदाचं विसर्जित करून मुक्ती देईल, अशीच कदाचित या अस्थिकलशांची अंतिम इच्छा असणार आहे. म्हणूनच कोरोना मृतांच्या नातेवाईकांना पालिका कर्मचाऱ्यांनी स्वत: फोन करून अस्थी घेऊन जाण्यास सांगितले देखील, पण अनेक जण कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी स्मशानभूमीत येऊन अस्थी घेऊन जायला टाळाटाळ करत आहे. हे ही वाचा-लहान मुलांवरील कोरोना लशीचं ट्रायल थांबवा; याचिकाकर्त्याने का घेतली कोर्टात धाव? नातेवाईकांच्या या अनास्थेबद्दल स्मशानभूमीतले कर्मचारी देखील प्रचंड व्यथित आहेत. याबद्दल कैलाश स्मशानभूमीतील पालिका कर्मचारी ललित जाधव सांगतात, "मृतदेह हे 750-800 डिग्री सेल्सीअस तापमानात जळतं तर त्यात फक्त अस्थी शिल्लक राहते..कोरोना नाही..म्हणून नातेवाईकांना एकच विनंती आहे या अस्थी जमलं तर घेऊन जा आणि आपल्या नातेवाईकांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही नाही नेल्या तर आम्ही विधी करून येत्या काही दिवसात त्याचं विसर्जन नदीपात्रात करू. यापूर्वीही आम्ही तीनशे अस्थि कलश संगम घाटावर विसर्जित केलेत...." धर्मशास्त्रात असं म्हणतात की, अस्थि विसर्जन झाल्याशिवाय मृतात्म्यास मुक्ती मिळत नाही, कदातिच म्हणूनच हिंदु धर्मात थेट काशीला जाऊन गंगेत अस्थि विसर्जनाची परंपरा आहे. पण इथं तर काही लोक कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या आप्तेष्ठांच्या अस्थीच बेवारसपणे टाकून देऊ लागलेत. याला काय म्हणावं हेच सुचत नाही. खरंच, या कोरोना महामारीत आपल्याला आणखी काय काय बघावं लागणार हे कदाचित त्याचं त्यालाच ठाऊक.
Published by:Meenal Gangurde
First published: