पुणे, 12 जून: मागील दोन महिन्यांपासून पुण्यासह महाराष्ट्रात लॉकडाऊनची (Lockdown) अंमलबजावणी करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळातील पुण्यातील बससेवा (PMP) बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक पीएमपी पास धारकांना (PMP Pass) बससेवाचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे त्यांचं काही प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी 3 एप्रिलपूर्वी पीएमपी बसचा पास काढलेल्या प्रवाशांना मुदतवाढ (PMP pass extension) देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहारातील हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
खरंतर, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पास केंद्रावरून पीएमपीचे बस पासेस काढलेले आहेत. परंतु, 3 एप्रिल रोजी अचानक राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अशा बस पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी पास काढलेल्या नागरिकांना मुदत वाढ देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पण त्यासाठी प्रवाशांना पास केंद्रांवरून जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे.
सध्या महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 6 जूनपासून पीएमपी सेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना लॉकडाऊनच्या काळात पासचा लाभ घेता आला नाही. अशा प्रवाशांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वारगेट, हडपसर बसस्थानक, मनपा, डेक्कन, पुणेस्टेशन (मोलेदीना), वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चैक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) आळंदी, सासवड, उरूळीकांचन व राजगुरूनगर आदी पास केंद्रांवर पासची मुदत वाढवून मिळणार आहे.
हे ही वाचा-गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांचं पाऊल; खास अॅपची केली निर्मिती
त्यामुळे पास धारकांनी 20 जूनपर्यंत संबंधित पास केंद्रात जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे. कारण 20 जूननंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. पास धारकांनी अर्ज केल्यानंतरचं त्यांना मॅन्युअल आणि मी-कार्डची मुदत वाढवून मिळणार आहे. त्यासाठी पासधारकांनी अर्ज आणि मुळ पाससह संबंधित पास केंद्रातून मुदत वाढवून घ्यावी, असं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.