पिंपरी, 17 जुलै: भागीदारीत व्यवसाय (Business in Partnership) करण्यास प्रवृत्त करून पिंपरीतील एका व्यक्तीची तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं विश्वासघात करत फिर्यादीच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीनं भागीदारीतील दोन्ही व्यवसाय आपल्या ताब्यात घेतले आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी गेलं असता आरोपीनं फिर्यादीस धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीनं हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सीताराम हाथीराम चौधरी असं फसवणूक झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते पुनावळे येथील रहिवासी आहेत. फिर्यादी सीताराम चौधरी यांच्या तक्रारीनंतर, हिंजवडी पोलिसांनी मुख्य आरोपी विनोदकुमार पारसमल जैन याच्यासह प्रकाश गुजर, राजेश, पुणे पिपल्स को. ऑप. बँक लि. या बँकेच्या कोथरूड शाखेचा सेवानिवृत्त व्यस्थापक महेश प्रभाकर केंकरे आणि संबंधित बँकेचे तत्कालीन सेवक स्वप्नील राक्षे आदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करत 2019 ते 2020 च्या दरम्यान फिर्यादीची फसवणूक केली आहे.
हेही वाचा-सायलेन्सर चोरून लाखोंची कमाई करणारी टोळी गजाआड, कारण ऐकून पोलीसही अचंबित
आरोपी विनोदकुमार जैन यानं फिर्यादीला अंतर्मना पी. व्ही ग्रेनाईट आणि अंतर्मना टाईल्स या फर्मच्या नावानं 33 गुंठे जागा भाड्यानं घेण्यास आणि त्याठिकाणी ग्रेनाइट विक्रीचा व्यवसाय करण्यास सांगितलं. त्यासाठी 32 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा भरवसाही दिली. फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीनं काही दिवसांनी फिर्यादीच्या मालकीच्या अंतर्मना टाइल्स या फर्मच्या पुणे पिपल्स को. ऑप. बँकेच्या कोथरूड शाखेतील खात्याच्या माहितीत फेरफार केला.
हेही वाचा-आलिशान गाड्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कंपनीच्या CEOसह तिघांना अटक
यासाठी आरोपी विनोदकुमार यानं बँक मॅनेजर केंकरे आणि राक्षे यांची मदत घेतली. आरोपीनं फिर्यादीच्या बँक खात्याचा मोबाइल नंबर बदलून स्वतःच्या मोबाइल नंबरची नोंद करून घेतली. त्यानंतर आरोपीनं फर्मच्या बँक खात्यातून तब्बल 82 लाख 28 हजार 82 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. तसेच अंतर्मना टाईल्समध्ये अद्याप 34 लाखाहून अधिक रुपयांचा स्टॉक असताना आरोपीनं फिर्यादीच्या फर्मवर कब्जा केला. तसेच फिर्यादीच्या सह्या असलेल्या धनादेशाचा वापर करत पैसे लुबाडले आहेत.
हेही वाचा-कंपनीचा 20 लाखांचा चेक चोरून लावला चुना; मिरजमधील शिवसेना शहर प्रमुखाला अटक
लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं विश्वासघात करत फिर्यादीचे एक कोटी 48 लाख 36 लाख 722 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच आरोपीनं भागीदारीतील दोन्ही फर्म स्वत:च्या ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित फर्मच्या ठिकाणी फिर्यादी गेले असता, आरोपी विनोदकुमार यानं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं फिर्यादीस धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Financial fraud, Pimpari