EXPLAINER : पुण्यात कोरोनाची दुसरी लाट नेमकी कशी आटोक्यात आली? वाचा न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट

प्रतिकात्मक फोटो

पुण्यातील कोरोना संसर्गाचा पॉजिटिव्हीटी रेट 4 जून अखेर 5 टक्क्यांच्या खाली आल्याने पुणे मनपा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला

  • Share this:
पुणे, 4 जून : पुण्यातील कोरोना संसर्गाचा पॉजिटिव्हीटी रेट 4 जून अखेर 5 टक्क्यांच्या खाली आल्याने पुणे मनपा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. एवढंच नाहीतर सर्वाधिक रूग्णवाढीत देशात दोनदा पहिल्या क्रमांकावर पोहोचलेलं तेच पुणे आता रिकव्हरी रेटमध्येही अव्वल ठरलंय. पुण्याचा आजचा रिकव्हरी रेट 97.15 टक्क्यांवर गेला असून शहरात आता फक्त 2 टक्के सक्रिय केसेस आहेत. अर्थात कोरोना साथीच्या या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी पुणेकरांना तब्बल दोन महिने लॉकडाऊन पाळावा लागला, तेव्हा कुठे हा दिलासा मिळाला आहे. पुण्यात कोरोनाची ही दुसरी लाट फेब्रुवारीच्या मध्यापासून जोर धरू लागली. पण सुरूवातीला मृत्यूंचं प्रमाण कमी असल्याने बहुतांश पुणेकर होम आयसोलेशनमध्ये राहूनच कोरोनावर मात करू लागले. पुणे मनपा देखील सीसीसी सेंटरचा खर्च वाचतोय म्हणून गृहविलगीकरणाला प्रोत्साहन देऊ लागली आणि तिथेच खरी गफलत झाली. कारण प्रतिज्ञा पत्रावर लिहून देणारे पुणेकर चार दिवसांनी बरं लागताच बिनदिक्तपणे बाहेर पडू लागले आणि अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला. कंटोनमेंट झोन तर केवळ नावालाच कागदावर दिसत होते. प्रत्यक्ष शहरभर समुह संसर्ग झाला होता. अशातच होम आयसोलेशनमुळे अख्खी कुटुंबंच्या कुटुंंबं कोरोना बाधित होऊ लागली आणि तिथंच खऱ्या अर्थाने परिस्थिती हाताबाहेर गेली. हाहा म्हणता गंभीर रूग्णसंख्या वाढल्याने हॉस्पिटल्स कोरोना रूग्णांनी ओव्हरफ्लो झाली. नंतर मग साहजिकच गंभीर रूग्णांना बेड्स मिळेनासी झाली. विशेषत: एप्रिलच्या मध्यावर तर पुण्यात कोरोनाचा शब्दश: विस्फोट झाला. हे ही वाचा-पंढरीची ओढ! सांगाल ते नियम पाळू, पण पायी वारीची परवानगी द्या-वारकरी संप्रदाय 18 एप्रिलला पुण्यात कोरोना अॅक्टिव्ह रूग्णांची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आणि ती होती तब्बल 56 हजार 663...!!! अशातच ऑक्सीजनचा तुटवडा जाणवू लागला, नंतर रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार. असं काय नाही ती सर्व संकटं पुणेकरांवर एकामागून एक आदळत गेली. त्या काळात अनेक रूग्ण तर केवळ बेडस मिळत नाही, ऑक्सीजन मिळत नाही म्हणून घरीच प्राण सोडू लागले...खरंच खूपच चित्र होतं ते... मग सरतेशेवटी पुण्यात 2 एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन लागलं...म्हणजेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी... मग नंतर सगळीच दुकानं बंद करावी लागली... तेव्हा कुठे रूग्णवाढीला थोडाफार आळा बसला. पण तोपर्यंत अनेक पुणेकरांना जीव गमवावे लागले होते. त्याकाळात तब्बल महिना दीड महिना दररोज 70-80च्या घरात कोरोना रूग्णांचे मृत्यू होत होते. त्याच काळात पॉजिटिव्ही रेट 30 टक्क्यांवर गेला होता. मग अखेर मे महिना उजाडल्यानंतर हळूहळू कोरोना साथीच्या प्रमाण कमी होऊ लागलं पण तरीही पूर्ण साथ आटोक्यात यायला जून महिना उजाडलाच. याच काळात पुण्यात ऑक्सीजनची गरज तब्बल चारशे मेट्रिक टन जाऊन पोहोचली होती. तीच आता पुन्हा 190 मेट्रिक टनांपर्यंत घसरलीय ही निश्चितच समाधानाची बाब म्हणावी लागेल. तसंच 57 हजारांवर गेलेली अॅक्टिव्ह रूग्ण संख्या आता 4 हजारांपर्यंत खाली आली आहे. आजमितीला शहरात 80 टक्के ऑक्सीजन बेड्स रिकामे आहेत तसंच पॉजिटिव्ही रेटही पाच टक्क्यांच्या खाली घसरलाय हा पुणेकरांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. पण त्यासाठी गेल्या 14 महिन्यात तब्बल 8 हजारांच्यावर पुणेकरांना आपले प्राण गमवावे लागलेत हे विदारक सत्य देखील विसरून चालणार नाही. म्हणूनच पुणेकरांनो शहरात कोरोनाची पुन्हा तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर कोरोनाची त्रिसुत्री पाळा आणि होता होईल तेवढी लवकर लस घ्या. कारण हा लॉक-अनलॉकचा खोखो पुणेकरांना अजिबात परवडणारा नाही. पुणे शहराचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक शहराचा रिकव्हरी रेट तब्बल ९७.१५ टक्क्यांवर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८९९ दिवसांवर पुणे शहरात आत्तापर्यंत ११ लाख २२ हजार ८११ जणांना देण्या आली लस... तर रुग्णसंख्या घटल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये मोठी घट... शहरात फक्त २८ कंटेन्मेंट झोन सक्रिय केसेस 2 टक्के पुणे लसीकरण स्टेटस 11 लाख जणांना लशीचा पहिला डोस, 2 लाख 61 हजार 625 जणांना दोन्ही डोस आता पुण्यातील संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट कसा उतरत गेला ते पाहूया तारीख     चाचण्यांची संख्या    रूग्णसंख्या    संसर्गाचा दर 27 मे             8193      588      7.17    28 मे 29 मे            7966      559       7 30 मे            7423     486       7 31 मे            4439     180       4 1 जून           5964      384       6.43 2जून            7483      467       6.25 3 जून           8166       450      6 4 जून           7871      349        5
Published by:Meenal Gangurde
First published: