दौंड, 10 जानेवारी : एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती केली आहे. शिंदे आणि कवाडे यांची युती झाल्यामुळे भाजपसोबत असलेले आरपीआयचे रामदास आठवले नाराज झाले आहेत. जोगेंद्र कवाडे यांना घेताना माझ्याशी चर्चा करायला हवी होती, त्यांना घेण्याची गरज नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनी युती केल्याने रामदास आठवले नाराज झाले, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी आरपीआयने आरपीआयचं काम करावं, कवाडे सरांचं समर्पण मोठं आहे, असं बावनकुळे म्हणाले.
'निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांना ज्यांचे विचार पटतात ते निवडणुकीत एकत्र येतात. शिंदे गट कवाडे गट युती झाली असेल तर अभिनंदनच आहे. शिंदे यांनी विचार करूनच युती केली असेल. आरपीआयने आरपीआयचं काम करावं. कवाडे सरांचं समर्पण मोठं आहे. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाचा फायदा एकनाथ शिंदे यांना नक्कीच होईल,' असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
आरपीआय नाराज
जोगेंद्र कवाडे यांना शिंदे गटासोबत घेतल्यामुळे आरपीआय आठवले गट नाराज झाला आहे. आरपीआय नेते अविनाश महातेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. 'पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांच्या शिवेसनेसोबत युती केली. आजदेखील आम्ही मित्र पक्ष म्हणून भाजपबरोबर आहोत. भाजपबरोबर शिंदेंची मैत्री झाली यामध्ये रामदास आठवले कार्यरत होते. हा गट येतोय हे सांगणं शिंदेंची जबाबदारी होती,' असं अविनाश महातेकर म्हणाले.
'मित्र पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र हा गट घेऊन आमच्यासोबत या चळवळीतील लोक आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आरपीआयमधील गट घेण्याआधी आमच्याशी बोललं पाहिजे होतं. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबतच्या युतीबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. कवाडे सरांना यायचं होतं, तर आठवलेंशी चर्चा केली पाहिजे होती. जे लोक टीका करत होते, तेच लोक आता पक्षप्रवेश करत आहेत,' असं म्हणत अविनाश महातेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Ramdas athawale