...म्हणून पुण्यातील रुग्णालयात नव्या रुग्णभरतीला बसला खीळ; डॉक्टरांनी व्यक्त केली अगतिकता

...म्हणून पुण्यातील रुग्णालयात नव्या रुग्णभरतीला बसला खीळ; डॉक्टरांनी व्यक्त केली अगतिकता

नाशिकमध्ये झालेल्या घटनेनंतर नागरिकांनी धसका घेतला आहे.

  • Share this:

पुणे, 22 एप्रिल : पुणे शहरात ऑक्सिजन रिफिलिंग प्लॅन्टना होणारा द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा निम्म्यावर आल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळं रुग्णालयांना केला जाणारा वायुरूप ऑक्सिजन पुरवठाही 50 टक्क्यांनी घटला आहे. याचा परिणाम म्हणून रुग्णालयात जरी 10 ऑक्सिजन बेड असले तरी 2,3 रुग्णांनाच भर्ती केलं जात आहे. ऑक्सिजन संपून रुग्ण दगावले तर काय करणार? ही मोठी समस्या डॉक्टरांपुढे आ वासून उभी आहे.

पुण्यात चाकण MIDC अर्थात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यात द्रवरूप ऑक्सिजन तयार होतो. हा लिक्विड ऑक्सिजन मग भोसरी तसंच कात्रज बोगड्यापलीकडील शिंदेवाडी भागातील रिफिलिंग प्लांटसमध्ये नेला जातो. जिथं व्हेपरायजेशन प्रक्रिया करून वायुरूप ऑक्सिजन तयार केला जातो आणि हा ऑक्सिजन सिलिंडर्समध्ये भरून रुग्णालयांना रवाना केला जातो.

हे ही वाचा-पुण्यातील 'हे' रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी ठरतंय वरदान; मृत्यूदर अवघा 0.1 टक्के

सध्या हे रिफिलिंग प्लांट दिवसाचे चोवीस तास काम करीत आहेत. तलाठी आणि पोलीस यांचीही उपस्थिती इथं अनिवार्य करण्यात आली आहे. ऑक्सीजन सिलेंडर्सची चोरी किंवा वाद होऊ नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे. आमच्या रिफिलिंग प्लांटची 20 टन क्षमता आहे. मात्र जेमतेम 10 टन द्रवरूप ऑक्सिजन मिळत आहे. यामुळं आम्ही ही कमीच वायुरूप ऑक्सिजन सिलिंडर पुरवू शकतोय अशी माहिती अतुल नलावडे आणि प्रकाश गायकवाड या ऑक्सिजिन रिफिलिंग प्लॅन्ट मालकांनी दिली आहे. मात्र क्षमतेच्या निम्माच ऑक्सिजन मिळत असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.

या प्लांटसवर रुग्णालयाचे टेम्पो, टँकर रुग्णवाहिका यांची अखंड वर्दळ सुरू आहे. विशेष म्हणजे छोट्या रुग्णालयांतील डॉक्टर औषधोपचार सोडून रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर्स घ्यायला स्वतः धावपळ करतायत. औषधाविना नाही तर ऑक्सिजन विना रुग्ण दगावणे इतकी वाईट परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं. म्हणूनच आम्ही क्षमता असून अधिक रुग्णांना भर्ती करणं बंद केलं आहे. त्याच रुग्णांना ऑक्सिजन पुरत नाही. ही भीषण वस्तुस्थिती असल्याचं हांडेवाडी येथील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर आनंद कांबळे यांनी सांगितलं. 10 रुग्ण भर्ती करू शकतो पण ऑक्सीजन मिळालं नाही तर काय? मग दोनच रुग्ण ठेवतो आणि त्यांचे प्राण वाचवतो ही डॉक्टर कांबळे यांची प्रतिक्रिया परिस्थिती किती भीषण आहे याची निदर्शक आहे.

पुणे शहराला दररोज  370 टनाच्या आसपास ऑक्सीजनची गरज आहे. मात्र 290 टन इतकाच मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी परिस्थिती बिकट बनली होती. आता थोडी सुधारली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 22, 2021, 6:17 PM IST

ताज्या बातम्या