पुणे, 26 मार्च : गेले वर्षभर कोरोना नियमांचं सक्तीने पालन केल्यानंतर कुठे यावर्षाच्या सुरुवातीला दिलासा मिळत होता. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाली. राज्यात जिथं कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्या पुण्यानेसुद्धा (Coronavirus in pune) कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा कोरोना नियम थोड्याफार प्रमाणात शिथील केले. पण हा दिलासा अवघ्या काही आठवड्यांपुरताच. त्यानंतर मात्र कोरोना गेलाच असं समजून कोरोनाची भीती मनात न ठेवता नागरिक बिनधास्त फिरू लागले आणि त्यानंतरचे भयावह दुष्परिणाम आता समोर आले आहेत. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात (Pune active corona patient) आहे आणि इथं आता कोरोना रुग्णांचा आकडा भरभर वाढू लागला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील नव्या कोरोना रुग्णांनी 7 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 24 तासांत 7090 इतक्या उच्चांक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर तब्बल 37 जणांचा मृत्यू (Pune corona patient death) झाले. पुणे जिल्ह्यात सर्वात गंभीर परिस्थिती आहे ती पुणे शहराची. पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून दररोज साडेतीन हजार रुग्ण सापडत आहेत. आजही 3594 रुग्णांची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्येसुद्धा एक हजारच्या पुढे रुग्ण आहेत. पुण्यातील रुग्ण इतक्या प्रमाणात वाढले आहेत की आता बेड्ससुद्धा उपलब्ध नाहीत. यावरून किती भयावह परिस्थिती आहे, हे स्पष्ट होतं. हे वाचा - मोठी बातमी : 24 तासांत 112 बळी; नव्या रुग्णांसह आता मृत्यूचा वेगही वाढला पुणे, नागपूर, मुंबई इथल्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढवलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 24 तासांत 36,902 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 112 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर 2.04 टक्के इतका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात नाइट कर्फ्यू जाहीर केला आहे. यादरम्यान नागरिकांना रात्रीचा प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार की नाही याबाबत 2 एप्रिलला बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ‘लॉकडाऊन करण्याची अजिबात इच्छा नाही मात्र दुसरी लाट थांबवायची तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे’, असंही अजित पवार म्हणाले. पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊन लागू करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हे वाचा - देशातील कोरोनामुळे सरकारनं उचललं पाऊल, गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश तर देशभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला निर्देश दिले आहेत. आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवांदरम्यान कोरोना प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करावे, असंही यामध्ये म्हणण्यात आलं आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे सक्तीने पालन करावे, असंही सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.